अवैध उत्पादांवर धाडसत्र

0

धुळे । धुळे जिल्ह्यात अवैध धंदेचालकांचे ’बुरे दिन’ सुरु झाले असून पोलिसांचे धाडसत्र सुरु असल्याने अवैध उत्पादकांचे धाबे दणाणले आहेत. जिल्हा पोलिसांकडून सततच्या कारवायांमध्ये अनेक ठिकाणी छापेमारी सुरु असून लाखो रुपयांचा अवैध माल जप्त करून नष्ट केला जात आहे. यामध्ये बनावट दारू, गुटखा यांसारख्या व्यसनाधीन बनविणार्‍या पदार्थांचा समावेश आहे. या कारवायांमुळे पोलिसांचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून नियमित धाक निर्माण करण्याची इच्छा नागरिकांनी बोलून दाखविली आहे. चाळीसगाव रोड पोलिसांनी इंदूरहून मुंबईकडे जाणार्या दोन ट्रॅव्हल्समधून 10 लाख 67 हजारांचा गुटखा पकडला तर शहरातील पांझरा पोळ परिसरात बनावट मद्य निर्मितीचा कारखाना पोलिसांनी उध्वस्त केला.

दोन ट्रॅव्हल्समधून गुटखा पकडला
नुकताच साक्री पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी एस टी बस मधून लाखोंचा गुटखा पकडला होता. दरम्यान काल दुपारी मुंबई आग्रा महामार्गावरील 40 गाव चौफुली येथे चाळीसगाव रोड पोलिसांनी इंदूरहून मुंबईकडे जाणार्‍या दोन ट्रॅव्हल्समधून 10 लाख 67 हजारांचा गुटखा पकडला. या प्रकरणी संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बनावट मद्याचा कारखाना उध्वस्त
येथील पारोळा रोडवरील गावात अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत शहरातील पांझरा पोळ परिसरात बनावट मद्य निर्मितीचा कारखाना पोलिसांनी उध्वस्त केला. भरवस्तीत हा मद्य निर्मितीचा कारखाना सुरु असल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी तिघा भावंडांना ताब्यात घेण्यात आले आहे. परंतु यामागचा मुख्य सूत्रधार पोलीसांच्या हाती लागला नसल्याची चर्चा आहे. पोलीस अधीक्षक चैतन्या व अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांना शहरातील पांझरा पोळ येथे बनावट मद्य निर्मिती सुरु असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्या आधारे आज सकाळी अप्पर पोलीस अधीक्षक गवळी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक देवीदास शेळके, पीएसआय दिलीप माळी, हवालदार सुनील विंचूरकर, महेंद्र कापूरे, संदीप थोरात, मायूस सोनवणे, मनोज बागुल, मनोज पाटील, तुषार पारधी, केतन कनखरे, विजय मदने, विलास पाटील यांच्या मदतीने छापा टाकला. तेथे मोठ्या प्रमाणात बनावट मद्य निर्मितीचे साहित्य आढळून आले. यावेळी तिघे जण बनावट मद्य तयार करीत होते. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. कारवाईत अंदाजे 3 लाखाचा माल जप्त केला आहे.

मध्यप्रदेशातील ट्रॅव्हल्स
इंदूरहून मुंबईकडे जाणार्‍या ट्रॅव्हल्समध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा तस्करी होत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. त्या अनुषंगाने हेमंत पाटील, पीएसआय तडवी, प्रभाकर बैसाणे, जोएब पठाण, साहेबराव भदाणे, प्रेमराज पाटील, शंकर महाजन यांनी काळ दुपारी सापळा रचून महामार्गावरील चाळीसगाव चौफुली येथे इंदूरहून येणार्र्‍याा दोन ट्रॅव्हल्स थांबविल्यात. या दोन्ही ट्रॅव्हल्सची कसून झाडाझडती घेतली असता मागील डिक्कीत व सिटखाली असलेल्या बॉक्समध्ये महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा मोठ्या प्रमाणात आढळून आला. पोलिसांनी तात्काळ एमपी 30/ सी.9075 व एमपी 30/सी.5667 या ट्रॅव्हल्स जप्त केल्यात. दोन्ही ट्रॅव्हल्समधून विमल, आरएमडी यासह विविध कंपन्यांचा सुमारे 10 लाख 67 हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.