जळगाव । शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या गावठी दारू विक्री केली जात असल्याच्या माहितीवरून बुधवारी सकाळी शनिपेठ पोलिसांनी झिपरू अण्णानगर व वाल्मीकनगरात छापा मारून 19 हजार रूपयांची दारू जप्त केली आहे. यासोबतच अवैध दारू विक्री करणार्या महिलेस व तरूणास पोलिसांनी ताब्यात घेतले असून दोघांविरूध्द शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. झिपरू अण्णा नगर व वाल्मीकनगरात अवैधरित्या दारू विक्री व जुगार खेळला जात असल्याची गुप्त माहिती शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रविण वाडीले यांना मिळाली मिळाली. त्या माहितीच्या आधारावर बुधवारी सकाळीच पोलिस निरीक्षक प्रविण वाडीले तसेच पोलिस उपनिरीक्षक पवन राठोड, मिलींद कंक, अमित बाविस्कर, गणेश गव्हाळे, अनिल धांडे, सुनिता इंधाते, नरेंद्र ठाकरे आदी पोलिस कर्मचार्यांनी झिपरू अण्णा गाठले.
झिपरू अण्णानगरासह वाल्मीक नगरात मारला छापा
संतोष पवार ही अवैधरित्या गावठी दारू विक्री करता असतांना मिळून आली. त्यानंतर पोलिसांनी सरला पवार हिला ताब्यात घेतल्यानंतर तिच्याजवळ 12 हजार 600 रुपये किंमतीच्या 6 कॅन गावठी दारू तसेच 3 हजार 500 रूपये किंमतीच्या देशी दारूच्या 69 बाटल्या मिळून आल्या असून कॅन व बाटल्या पोलिसांनी जप्त केले आहेत. यानंतर शनिपेठ पोलिसांनी वाल्मीक नगरात छापा मारला असता त्या ठिकाणी राजेंद्र नारायण सोनवणे हा तरूण गावठी दारू विक्री करतांना मिळून आला. दरम्यान, त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याजवळून पोलिसांना 3 हजार रुपये किंमतीची दोन कॅन गावठी दारू मिळून आली. शनिपेठ पोलिसांनी अवैध दारू विक्री करणार्या महिला व तरूणाला ताब्यात घेतले असून एकूण 19 हजार रूपयांची दारू जप्त केली आहे. दरम्यान, शनिपेठ पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणून गेले आहे.