अवैध गावठी दारूभट्टीवर पोलिसांचा छापा

0

61 हजाराची दारू जप्त : दोन महिलांना अटक

यवत । दौंड तालुक्यातील बोरीभडक व डाळींब गावच्या शिवेवर असलेल्या ओढ्यालगत अवैधपणे सुरू असलेल्या गावठी दारू भट्टीवर यवत पोलिसांच्या पथकाने सोमवारी दुपारी टाकलेल्या छाप्यात 61 हजार रुपयांची गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन व साधने मिळून आली. पोलिसांनी ती हस्तगत करून नष्ट केली. याप्रकरणी दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. गुलाबाई मारूती राठोड (वय 45) व पयपाबाई मांजरीया राठोड (वय 65) अशी या महिलांची नावे आहेत.

बोरीभडक व डाळींब गावच्या शिवेवरील ओढ्यालगत गावठी दारुची भट्टी सुरू असल्याची माहिती खबर्‍यामार्फत पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस नाईक महेंद्र पवार, रमेश कदम, गणेश पोटे, संभाजी कदम या पोलिस पथकाने सोमवारी दुपारी या सुरू असलेल्या हातभट्टीवर अचानकपणे छापा टाकला. या छाप्यात पोलिसांना गावठी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन व दारू तयार करण्याची साधने आढळून आली. या कच्च्या रसायनाची व साधनांची 61 हजार रुपये किंमत असून ती पोलिसांनी नष्ट केली आहेत. दरम्यान पोलिसांनी गावठी दारू तयार करणार्‍या दोन महिला विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार नंदकुमार लोणकर करीत आहेत.