अवैध दारु विक्रेत्यांच्या धमकीमुळेच ‘त्या’युवकाची आत्महत्या

0

पाचोरा। तालुक्यातील व पिंपळगाव हरेश्‍वर पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेले डोंगरगाव येते 17 वर्षीय तरुणाने विषारी औषध सेवन करुन आत्महत्या केली. पोलिस प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आशिर्वादाने सर्रासपणे ग्रामीण भागात अवैध गावठी दारुची विक्री होते. त्यामुळे अनेक तरुण यात बळी पडतात. त्यातूनच ही घटना घडली आहे. मृत तरुण ज्ञानेश्‍वर पाटील (वय-17) आहे. त्याला दारु पिण्याचे व्यसन जडल्यामुळे तो उधारीने गावातील अवैध दारु विक्रेता आनंदा शेषराव लोखंडे व त्याची आई गयाबाई शेषराव लोखंडे यांच्याकडून गावठी दारु पित होता. अवैध दारु विक्रेत्यांची दारुची उधारी झाल्यामुळे त्या मायलेकांनी ज्ञानेश्‍वर यास उधारी न दिल्यास हात-पाय तोडून जिवंत ठार मारण्याची धमकी दिली. त्या धमकीला घाबरुन 3 जून रोजी ज्ञानेश्‍वर याने किटकनाशके सेवन केले.

पोलिस निरीक्षकाला बांगड्यांचा आहेर देणार- ग्रामस्थ
विषारी औषध सेवन केल्यानंतर ज्ञानेश्‍वर यास पाचोरा व जळगाव येथे प्रकृती अस्वास्थामुळे हलविले. जळगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरु असतांना 6 रोजी रात्री 10.30 च्या सुमारास ज्ञानेश्‍वरची प्राणज्योत मालविली. या घटनेने संतप्त गावकर्‍यांनी पिंपळगाव हरेश्‍वर येथील पोलिस स्टेशनवर घोषणेबाजी केली. अवैध दारु विक्रेत्यांवर कारवाईची मागणी केली. कारवाई न केल्यास पिंपळगावचे पोलिस निरीक्षक यांना बांगड्यांचा आहेर दिला जाईल. मयताच्या आईच्या फिर्यादीवरुन आरोपीविरुद्ध 306 नुसार गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित अवैध दारु विक्रेत्यावर राजकीय वरदहस्त असल्याचे बोलले जाते. दारुबंदी करणार्‍यांना तो धमक्या देतो.

वेळोवेळी निवेदन देऊनही कारवाई नाही
अवैध दारु विक्री बंद करण्यासाठी सरपंच दीपक पाटील व पोलिस पाटील सुजित वाळके यांनी वारंवार पिंपळगाव पो.स्टे व दारुबंदी पाचोरा व जळगाव येथील कार्यालयांना वेळोवेळी निवेदने दिली. परंतु संबंधित अधिकार्‍यांनी शून्य कारवाई केली. त्याच्या गलथानपणामुळे ज्ञानेश्‍वर पाटील या तरुणाचा नाहक बळी गेला. त्यामुळे गावकर्‍यांच्या संतप्त प्रतिक्रिया होत्या. आरोपीला अटक करण्याची मागणी गावकर्‍यांनी केली आहे. या घटनेला 2-3 दिवस होऊनही आरोपीला अटक नाही. पुढील तपास सपोनि संदीप पाटील हे करीत आहे.