अवैध दारूचा साठा प्रकरणातील आरोपीस कोठडी

0
जळगाव- नवजीवन एक्सप्रेसमधून जळगावाहून विदर्भात नेण्यात येणारी 64 हजार रूपयांची देशी-विदेशी दारूचा साठा गुरूवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाडून पकडण्यात आला होता़ या प्रकरणात अटकेत असलेला राहूल सावन बागडे (वय-29, रा़ नाथवाड, जळगाव) यास शुक्रवारी भुसावळ रेल्वे न्यायालयात हजर केले असता एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़ जळगावातून विदर्भातील चंद्रपुर येथे देशी-विदेशी दारू नेण्यात येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला गुरूवारी मिळाली होती़ त्यानुसार सायंकाळी 4़45 वाजेच्या सुमारास जळगावातील रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर बागडे याला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले़ त्याच्याकडून दहा ते बारा बॅगा देशी व विदेशी दारू मिळून आली़ दरम्यान, यापूर्वी देखील जळगावातून विदर्भात मोठ्या प्रमाणात दारूचा साठा नेणाजयांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाडून कारवाई करण्यात आली होती़ आता पुन्हा हा प्रकार उघडकीस आला़ दरम्यान, नेहमीच चोरट्या पध्दतीने वाहनांमधून होणारी अवैध दारूची वाहतुक ही आता चक्क रेल्वेतून घरगुती बॅगेत भरून केली जात आहे़ या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अटक केलेल्या राहुल बागडे याला शुक्रवारी रेल्वे न्यायालयात हजर करण्यात आले़ सुनावणीअंती त्यास एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे़ त्याने ही दारू कुठून आणली व कुठे नेणार होता़ याचा पोलीस तपास घेत आहेत़ या दारू साठाचा तस्करीच्या मागील मुख्य सुत्रधार कोण ? याचाही राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी शोध घेत आहेत़