अवैध दारूची विक्री करणारा उपसरपंच पोलिसांच्या जाळ्यात

0

पिंपळनेर । साक्री तालुक्यातील नांदर्खी येथील उपसरपंच कांतिलाल कुवर याला विनापरवाना देशी-विदेशी दारूची विक्री करताना पोलिसांनी पकडले आहे. पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नांदर्खी येथे कालिका देवीची यात्रा सुरू आहे.

या ठिकाणी नांदर्खीचे उपसरपंच कांतिलाल कुवर (वय 30) हे विनापरवाना देशी-विदेशी दारूची विक्री करीत असल्याची माहिती पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुनील भाबड यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी यात्रेत बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना कारवाई करण्याची सूचना दिली होती. पोलिसांनी मान्या चिमा कुवर यांच्या शेतात शनिवारी रात्री पावणेअकरा वाजेच्या सुमारास कांतिलाल कुवर याला अटक केली. या वेळी त्याच्याजवळ असलेल्या स्वतःच्या क्रुझर (क्र.एमएच 16, एजे 3835)मध्ये सुमारे 10 हजार 948 रुपयांची देशी- विदेशी एक हजार 150 रुपयांची हातभट्टीची दारू आढळून आली. दारूसह दोन लाखांचे वाहन असा 2 लाख 12 हजार 278 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.