शिरूर । शिरूर तालुक्यातील अवैध दारू धंद्यांवर राज्य उत्पादन शुल्क व पोलीस प्रशासनाच्यावतीने कारवाई करण्याचे तसेच तालुक्यातील 93 ग्रामपंचायतींचे दारूबंदीचे ठराव मिळाल्यानंतर 30 दिवसांच्या आत निवडणूक घेण्यात येणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकांर्यानी आश्वासन दिल्यानंतर क्रांतीवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी सुरू केलेले उपोषण गुरुवारी तिसर्या दिवशी मागे घेतले. शिरूर तालुक्यात संपूर्ण दारूबंदी करण्याच्या मागणीसाठी पाचंगे यांनी मंगळवारी शिरूर तहसिल कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. त्याबाबत तहसिलदार रणजीत भोसले यांनी पुढाकार घेऊन राज्य उत्पादन शुल्क, तालुक्यातील तिन्ही पोलीस स्टेशनचे अधिकारी, महसूल व पंचायत समितीच्या अधिकार्यांची बैठक प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात घेण्यात आली होती.
यावेळी तहसिलदार रणजीत भोसले, प्रवीण तांबे, सुभाष उमाप, संदीप जठार, धनंजय गायकवाड, रमेश टाकळकर, बाळासाहेब घाडगे, दिनकर साबळे, आबासाहेब गव्हाणे, सुरेश थोरात, गणेश जामदार, बाबुराव पाचंगे, नम्रता गवारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले, उपपोलीस निरीक्षक सोमनाथ वाघमोडे, भिमगोंडा पाटील, उपपोलीस निरीक्षक अमोल गोरे, मंगेश कावळे आदी उपस्थित होते.यावेळी पाचंगे म्हणाले, माझा लढा कोणा व्यक्ती विरोधात नसून व्यवस्थेच्या विरोधात आहे. तालुक्यातील 93 ग्रामपंचायतींनी दारूबंदीचे ठराव केलेले असतानाही तालुक्यात दारूबंदीची कारवाई होताना दिसत नसल्याची नाराजी व्यक्त करून राज्य उत्पादन शुल्क व पोलीस प्रशासनाच्या कारभारावर टीका केली. 93 ग्रामपंचायतींचे दारूबंदीचे ठराव अद्याप मिळाले नसून ते मिळाल्यानंतर 30 दिवसांच्या आत दारूबंदीसाठी निवडणुक घेण्यात येईल असे राज्य उत्पादन शुल्कचे उप अधिक्षक प्रविण तांबे यांनी यावेळी सांगितले असता पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संदीप जठार यांनी शुक्रवारी सर्व दारूबंदीचे झालेले ठराव राज्य उत्पादन शुल्क विभागाला पाठविणार असल्याचे सांगितले.
महिन्याच्या तिसर्या सोमवारी बैठक
तालुका दारूबंदी समितीची बैठक घेण्यास सुरूवात केली असून दर महिन्याला महिन्याच्या तिसर्या सोमवारी दारूबंदी समितीची बैठक घेऊन त्याचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवणार असून प्रशासन कायद्याच्या चौकटीत राहून सदृढ समाजासाठी तालुक्यात दारूबंदीकरीता प्रामाणिक आणि सातत्यपूर्ण काम करणार असल्याचे तहसिलदार रणजीत भोसले यांनी यावेळी सांगितले.