अवैध दारू कारखाना भोवला : भुसावळ राज्य उत्पादन शुल्कच्या निरीक्षकांसह चौघांचे निलंबन

भुसावळ : भुसावळातील स्थानिक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाकावर टिच्चून शिवपूर कन्हाळे रस्त्यावर अवैधरीत्या बनावट दारूचा कारखाना सुरू असताना कारवाई करण्यात आली नाही मात्र पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पाचशे किलोमीटर अंतरावरून येवून स्थानिक कारखाना उद्ध्वस्त केल्याची दखल घेत या विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी भुसावळातील निरीक्षकांसह चौघांचे निलंबन केल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागात मोठी खळबळ उडाली आहे. निरीक्षक ईश्‍वर वाघ, दुय्यम निरीक्षक के.बी.मुळे, जवान एस.एस.निकम, एन.बी.पवार अशी निलंबीत कर्मचार्‍यांची नावे आहेत.

फर्निचर गोदामात सुरू होता कारखाना
भुसावळ शहरातील शिवपूर-कन्हाळा रोडवर एका फर्निचरच्या दुकानाच्या गोदामात अवैधरीत्या दारू बनवण्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती पुणे उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाल्यानंतर अधिकार्‍यांनी शनिवार, 17 रोजी सायंकाळी अचानक छापा टाकत सुमारे 11 लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता. या प्रकरणी फर्निचर गोदामाचे मालक रवींद्र ढगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. पुणे येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईनंतर भुसावळातील स्थानिक अधिकार्‍यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते.

आता किमान धडक कारवाईची अपेक्षा
शहरासह तालुक्यात अवैधरीत्या गावठी दारू मोठ्या प्रमाणात गाळली जात असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई होत नसल्याने जनतेचा रोष वाढला आहे. पोलीस प्रशासन अवैध धंद्यावर कारवाई करीत असताना स्थानिक राज्य उत्पादन शुल्क विभागाने डोळेझाक केल्याने आश्‍चर्य व संताप व्यक्त होत आहे.