अवैध दारू विक्रीविरूध्द गावकर्‍यांचा मोर्चा!

0

जळगाव । तालुक्यातील भोकर येथे होणार्‍या अवैध दारु विक्रीविरुध्द गावकर्‍यांनी शनिवारी गावात मोर्चा काढून तालुका पोलीस स्टेशन व जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. शंभराच्यावर जणांनी पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांच्या दालनात ठिय्या मांडला. दारु बंदीसाठी घोषणाबाजी करण्यात आली. दारु विक्रेत्यांविरुध्द कारवाई झाली नाही तर होणार्‍या परिणामाला पोलीस जबाबदार असतील, असा इशारा गावकर्‍यांनी दिला. भोकर गावात कोळीवाड्यात होणार्‍या दारु विक्रीमुळे शेजारच्या लोकांना त्रास होत आहे.

रात्री बेरात्री ठोठावता दार…
दारु पिणारे रात्री बेरात्री रहिवाशांच्या घराचा दरवाजा ठोठावतात. मद्याच्या नशेत गल्लीतील महिलांना अश्लिल बोलतात.दारुच्या आहारी गेल्याने अनेकांचा बळी गेला आहे. निष्पाप महिला विधवा झाल्या आहेत. पोलिसांना कळविले तर पोलीस येण्याआधी त्यांना कारवाईची माहिती मिळते, त्यामुळे पोलिसांच्या हाती काहीच लागत नाही अशा शब्दात ग्रामस्थांनी पोलिसांवरही आरोप केले. दरम्यान, पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील व सहायक निरीक्षक सागर शिंपी यांनी दारु विक्रेत्यांची नावे घेवून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
पोलीस स्टेशनमधून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. तेथे जिल्हाधिकारी नसल्याने अपर जिल्हाधिकाजयांची भेट घेवून त्यांना समस्या सांगून निवेदन सादर करण्यात आले. यावेळी आवारात मोर्चेकरांनी घोषणाबाजी केली.सचिन प्रभाकर पवार यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. गावातून ट्रक भरुन मोर्चकरी शहरात आले. या ट्रकला दारुंबदीसाठी मोर्चा असे मोठे बॅनर लावण्यात आले होते. अरुण शामराव सोनवणे, प्रभाकर रघुनाथ सोनवणे, सरपंच हरीष डिंगबर पवार, छाया ज्ञानेश्वर कोळी, सुभाष बळीराम पवार यांच्यासह दीडशे ते दोनशे जण मोर्चात सहभागी झाले होते.