जळगाव । गावात परवानाधारक देशी, विदेशी दारू विक्री दुकान नसताना काही लोक गावात दररोज अवैध दारू विक्रीसाठी येतात, त्यामुळे गावाची राखरांगोळी होत असून गोर गरीबांचा संसार उध्दवस्त होत आहे, अशा शब्दात कुर्हा हरदो (बोदवड) येथील महिलांनी मंगळवारी अपर पोलीस धिक्षक बच्चनसिंग यांची भेट घेऊन कैफियत मांडली. गावातील अवैध दारू विक्री संदर्भात 25 जून रोजी सर्व महिला एकत्र येऊन अवैध दारू पकडून ती बोदवड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देऊन पुढील कारवाई करावी, अशी विनंती महिलांनी पोलीसांना केली. परंतु त्यावेळी पोलीस स्टेशनचे बिट अंमलदार या महिलांना म्हणाले, सदर कार्यवाहीची जबाबदारी ही राज्य उत्पादन शुल्क विभागाची आहे. तुम्ही त्यांच्याकडे कार्यवाहीची मागणी करावी, असा सल्ला देत कारवाई करण्याविषयी असमर्थता दाखविली, असा आरोप महिलांनी निवेदनातून केला असून ही तक्रार त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षकांकडे देखील केली. यावेळी महिलांनी मागणी निवेदन सादर केले.
80 हजारांची दारू पकडून दिली तरीही कारवाई नाही…
श्री बच्चनसिंग यांनी बोदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षकांशी थेट संपर्क साधला. म्हणाले, कुर्हा हरदो येथील महिला दारूबंदीच्या मागणीसाठी अधीक्षक कार्यालयात आल्या आहेत. त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार केली होती. तसेच 80 हजाराची दारू पकडून दिली . परंतु त्यासंदर्भात अॅक्शन घेतली गेली नाही. अवैध व्यवसाय असतील तर ते बंद करण्याची पोलीसांची जबाबदारी ठरते, कोणालाही त्रास होणार नाही, यासाठी सतर्कत असले पाहिजे. अवैधधंदे विरोधात पोलिसांनी तत्काळ कारवाई करावी, अशी सुचना अप्पर पोलीस अधीक्षक बच्चनसिंग यांनी पोलीस निरीक्षकांना केली
महिलांनी मांडली कैफियत
अवैधदारू पिऊन गावात भांडणांही तोंड फुटत असून कुटुंबात कलह होताहेत. अनेक महिलांना मारहाण होऊन त्या भयभीत झाल्या आहेत. दारूमुळे अनेकांचे संसार उध्दवस्त झाले आहेत, अशी कैफियत मांडून महिला सिंग यांना म्हणाल्या. या प्रकरणी आपल्यास्तरावरून कारवाई झाल्यास ग्रामस्थांना विशेषत: महिलांना मोठा दिलासा मिळू शकणार आहे.
कैफियत शांततेने एकुण घेतल्यावर अप्पर पोलीस अधिक्षकांनी गाव कोणत्या पोलीस स्टेशन अंतर्गत येत ती माहिती जाणून घेतली. तसेच त्याठिकाणी तक्रार केली होती का? हे जाणून घेतले. शिष्टमंडळात कौशल्याबाई माळी, कस्तुराबाई माळी, यशोदाबाई माळी, तुळसाबाई माळी, मीराबाई माळी, कुसुमबाई इंगळे, मंगलाबाई इंगळे, बेबा मोरे, यशोदा इंगळे, अलंका इंगळे, वर्षा सपकाळे, आशा सुरडकर, सुशीला इंगळे, प्रतिभा रोकडे,लीलाबाई , उषाबाई सोनवणे,प्रमिलाबाई माळी, गीताबाई जाजंळ, माधुरी कळसकर, शोभा कळसकर, कमलाबाई फरपट यांच्यासह महिलांसह ग्रामस्थाचा सहभाग होता.
गावात दारूबंदी करा
सायंकाळपासून दारू पिणार्या लोकांचा त्रास अस्वस्थ करतो. म्हणून कायमस्वरूपी गावात दारूबंदी व्हायला हवी. यासाठी पोलीसांकडून कारवाई झाल्यास बरे होईल. त्या भावनेतूनच आज आम्ही पोलीस अधीक्षक साहेबांकडे निवेदन देण्यासाठी आलो होतो, अशी भावना सुशिलाबाई इंगळे यांनी व्यक्त केली. आम्हाला न्याय मिळावा, याच अपेक्षा आहेत. त्याअनुषंगाने पोलीसांनी विचार करावा.