यवत । वाढत्या अवैध धंद्यांवर अंकुश बसविण्यासाठी यवत पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी धडक कारवाई सुरू केल्याने अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
हातभट्टीची दारु, देशी-विदेशी दारु, मटका आदींना मागील काळात मोठा जोर चढला होता. त्यातच सर्वोच्च न्यायालयाने 1 एप्रिल 2017 पासून राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर पाचशे मीटरच्या आत कोणत्याही प्रकारची मद्य विक्री करण्यास मनाई केल्याने देशी-विदेशी मद्य सेवन करणारा ग्राहक मोठ्या प्रमाणात गावठी बनावटीच्या मद्य सेवनाकडे वळला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात हातभट्टीची दारु बनवणारांचे प्रमाण वाढले आहे. शिवाय महामार्गावर मद्य विक्रीसाठीचे अधिकृत परमिट रुम व बियरबार परवानगी रद्द झाल्याने महामार्गावरील अनेक हॉटेल व्यावसायिक यवत येथील देशीदारु विक्रीच्या परवानाधारक दुकानातून देशी दारुची विक्री करत होते. पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी बोरीभडक, कासुर्डी, यवत, बोरीपार्धी, पिंपळगाव यांसह आदी ठिकाणी अनधिकृतपणे मद्यविक्री करणार्या हॉटेल चालक-मालकावर धडक कारवाई केली. यवत पोलीस ठाण्याअंतर्गत असणार्या यवत, केडगाव, राहू, पाटस या मोठ्या गावांसह अनेक गावात असणार्या मटका व्यवसायांविरुद्ध जोरदार मोहीम हाती घेत यातील अनेकांविरुद्ध तडीपारीचा प्रस्ताव पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांना पाठविण्यात आला आहे. त्यामुळे हातभट्टी दारुविक्रेते, अनधिकृत देशी-विदेशी दारु विक्रेते आणि मटका व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
तक्रार करण्याचे आवाहन
यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी काही दिवसांपूर्वी व्यावसायिकांची बैठक घेतली होती. त्यामध्ये त्यांनी कोणत्याही पोलिसांना हप्ते देऊ नका, कोण जर पैसे मागीत असेल तर थेट माझ्याकडे तक्रार करा, असे आवाहान केले. तर पैसे घेणार्या पोलिसांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचा इशाराच गोडसे यांनी दिला आहे.