अवैध पाणीउपशाचा जगप्रसिद्ध लोणार सरोवरालाही फटका!

0

पुणे : उल्का पाषणाच्या आघातामुळे सुमारे 50 हजार वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात अवैध उपसा होत असल्यामुळे सरोवराच्या पाण्याचा परिघ 2014 पासून झपाट्याने कमी होत असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे. पुणेस्थित सेंटर फॉर सिटीझन सायन्स (सीसीएस) ही संस्था गेल्या काही वर्षांपासून येथे करत असलेल्या संशोधनातून ही बाब उघडकीस आली आहे. गेल्या तीन वर्षांत पाण्याच्या परिघात सरासरी 100 मीटरने घट झाल्याची बाबही या संस्थेने निदर्शनास आणून दिली. सरोवराच्या पाण्याचा घेर हा जवळपास 1.20 किलोमीटर इतक्या अंतराचा आहे. परंतु, सरोवराच्या 100 मीटर परिसरात मोठ्या प्रमाणात बोअरवेलद्वारे पाणीउपसा केला जात असल्याने सरोवरातील पाण्याची पातळी घटू लागली आहे. इको-सिन्सेटीव्ह झोन असतानादेखील या भागात कूपनलिका घेतल्या जात आहेत, ही अत्यंत धक्कादायक बाब आहे.

मनाई असतानाही परिसरात सर्रास बोअरवेल!
लोणार सरोवरातून प्रत्यक्ष पाणी उपसा होत नसला तरी, सरोवराच्या 100 मीटर परिसरात बोअरवेल घेऊन शेतकरी व नागरिक पाणीउपसा करत आहेत. हे पाणी शेतीच्या सिंचनासाठी अथवा घरगुती वापरासाठी वापरले जाते. त्यामुळे 2014 ते 2017 या पाच वर्षांच्या कालावधीत सरासरी 100 मीटरने सरोवरातील पाण्याचा घेर कमी झाला असल्याचे सीसीएसच्या चमूला आढळून आले आहे. सरोवर परिसरात भूजल पातळी चांगली असून, पाऊसमानदेखील चांगले आहे. त्यामुळे दरवर्षी पडणार्‍या पावसामुळे सरोवरातील भूजलस्तर कायम राहात होता. परंतु, अलिकडे कमी झालेले पाऊसमान, त्या तुलनेत वारेमाप होणारा पाणीउपसा यामुळे सरोवरावर त्याचा विपरित परिणाम झालेला आहे. लोणार सरोवर हे जागतिक वारसा असल्याने हा भाग इको-सेन्सिटीव्ह झोन म्हणून केंद्र सरकारने जाहीर केलेला आहे. या परिसरात उत्थनन अथवा बोअर घेण्यास मनाई आहे. तरीही सर्रास सरोवराच्या शंभर मीटर परिसरात बोअरवेल घेण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे सरोवराचे पाणी कमी कमी होत आहे. हा पाणीउपसा असाच कायम राहिल्यास पुढील 50 वर्षात सरोवरातील पाणी पातळी फारच कमी झालेली दिसू शकते, असे निरीक्षणही तज्ज्ञ व्यक्ती व्यक्त करत आहेत.

सरोवरावर अनेक संशोधकांचे संशोधन सुरु…
जगप्रसिद्ध लोणार सरोवराचा शोध ब्रिटीश अधिकारी सीजेई अलेक्झांडर यांनी 1823 मध्ये लावला होता. साधारणतः 50 हजार वर्षांपूर्वी उल्का पाषणाच्या आघातामुळे हे सरोवर निर्माण झालेले आहे. पुणेस्थित सीसीएस ही संस्था 2003 पासून या सरोवर परिसरात संशोधन करत असून, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक संशोधक या संशोधन मोहिमेत सहभागी आहेत. या संशोधकांनी सरोवराच्या पाण्यात 100 मीटरने घट झाली असल्याचे निरीक्षण नोंदविलेले आहे. या निरीक्षणाची नोंद तातडीने जिल्हा प्रशासनासह केंद्र सरकारनेही घेण्याची गरज निर्माण झालेली आहे.