अभय देणार्या अधिकार्यांवर फौजदारी गुन्हे
पिंपरी-चिंचवड : शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे न्यायालयाचे निर्देश आहेत. त्यामुळे कारवाई सुरुच राहणार आहे. 31 डिसेंबर 2015 पूर्वीची बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया सुरु आहे. बांधकामे नियमित करण्याचा शब्द भाजपने पाळला आहे. बांधकामे नियमित करण्याच्या नियमावलीतील अटी शिथिल करण्याचे धोरण महासभेत मंजुर केले जाणार आहे. शास्तीकर पुर्वलक्षी प्रभावाने माफ करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे, सभागृह नेते एकनाथ पवार यांनी सांगितले.
नियमितीकरणाचा शब्द पाळला
पवार म्हणाले, नागरिकांनी अनधिकृत बांधकामे करु नयेत. रितसर परवानगी घेऊनच बांधकामे करावीत. चार मजली अनधिकृत बांधकामे होईपर्यंत त्याला अभय देणार्या अधिका-यांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत. शहरातील विटेलाही हात लागू देणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिंचवड येथील जाहीर सभेत सांगितले होते. ते आश्वासन आम्ही पाळले आहे. शहरातील 2015 पूर्वीची अनधिकृत बांधकामे नियमित करण्यात येत आहेत. त्यामधील नियमवालीत बदल करुन अर्ज करण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात येईल. त्याबाबतचा प्रस्ताव महासभेत मंजूर करुन राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. पूर्वलक्षी प्रभावाने शास्तीकर माफ करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याचेही, त्यांनी सांगितले. तसेच न्यायालयाचे निर्देश असल्यामुळे यापुढे देखील अनधिकृत बांधकामवर कारवाई सुरुच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.