पिंपळे सौदागरमधील थरारक घटना : चौथ्या मजल्यावरून 30 वर्षीय विवाहितेने घेतली उडी
पिंपरी-चिंचवड : पिंपळे गुरवमध्ये अवैध बांधकामे पाडण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकासमोरच एका महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्त्या केली. यानंतर संतप्त जमावाने पथकासह जेसीबी व पोकलेन यंत्रावर जोरदार दगडफेक केली. यामुळे प्रशासनाने तात्काळ कारवाई थांबविण्याचे आदेश दिल्याने पथक मागे फिरले. ही थरारक घटना देवकर पार्कमध्ये मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. देवीबाई राम पवार (वय 30) असे आत्महत्त्या केलेल्या महिलेचे नाव आहे. दरम्यान, गेल्याच आठवड्यात याच परिसरातील मोरया पार्कमध्ये कारवाई सुरू असताना एका तरुणाने अंगावर रॉकेल ओतून घेत पेटवून घेण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकारामुळे प्रशासन कात्रीत सापडले आहे. या घटनेबद्दल पिंपरी-चिंचवड शहरात महापालिकेच्या कारवाईबद्दल तीव्र संताप व्यक्त होऊ लागला आहे.
चौथ्या मजल्यावरून मारली उडी
गेल्या काही दिवसांपासून महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम व नियंत्रण विभागाकडून पिंपळेगुरव परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जात आहे. मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास देवकर पार्क येथील अनधिकृत घरांवर कारवाई करण्यासाठी अतिक्रमण विभागाचे पथक गेले होते. अधिकार्यांनी कारवाईसाठी इमारतींची पाहणी सुरू केली. त्यामुळे संबंधित इमारतींमधील रहिवासी धास्तावले. यातूनच आपल्या घरावरील कारवाई टाळण्यासाठी देवीबाई पवार यांनी इमारतीच्या चौथ्या मजल्यावर धाव घेतली. यानंतर काही कळायच्या आतच त्यांनी उडी मारली. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले. त्यांना तात्काळ औंध जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला.
दगडफेकीमुळे पथक गेले पळून
दरम्यान, देवीबाई यांचा मृत्यू झाल्याची वार्ता परिसरात पसरली. यामुळे रहिवाश्यांमध्ये संतापाची लाट उसळली. पथकाने प्रत्यक्ष कारवाई सुरू करायच्या आतच नागरिकांकडून जोरदार दगडफेक सुरू झाली. चारही बाजूने दगडांचा मारा सुरू झाल्याने अधिकार्यांसह कर्मचारी पळून गेले. यानंतर लोकांनी पोकलेन मशीन व जेसीबी यंत्रांना लक्ष्य केले. चालक केबीनचा चक्काचूर झाला. दगडफेकीची माहिती मिळताचा वरिष्ठ अधिकार्यांनी परिसरातील कारवाई थांबविण्याचे आदेश तात्काळ दिले.
राजकीय आशीर्वादामुळेच बांधकामे फोफावली
राजकीय नेत्यांसह महापालिकेतील अधिकार्यांच्या उदार आश्रयामुळे पिंपळेगुरव, सांगवी परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे झाली आहेत. तसेच महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर बांधकामे पुन्हा सुरू झाली आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यापासून महापालिक प्रशासनाने या भागात कारवाईची मोठी मोहीम उघडली आहे. मात्र, लाखो रुपयांच्या इमारती पाडल्या जात असल्यामुळे नागरिक दहशतीखाली आहेत. यातून हा दुसरा प्रकार मंगळवारी घडला. काही दिवसांपूर्वी पिंपळे गुरव येथील मोरया पार्क पाच मजली इमारतीवर कारवाई सुरु असताना एका रहिवाशाने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण पसरले आहे.
दोन जगतापांतील वाद अन् महापालिकेची मोहीम?
दरम्यान, स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप आणि भाजपचे आमदार व शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्या वादातून पिंपळेगुरव परिसरात अनधिकृत बांधकामांवर हातोडा पडायला सुरुवात झाली आहे. दोन्ही जगताप हे एकाच भावकीतील आहेत तर राजेंद्र जगताप यांनी 2017 ची पालिका निवडणूक भाजपच्या तिकिटावर लढवली होती. त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला आणि तो लक्ष्मण जगताप यांनी अपक्ष उमेदवाराला मदत केल्याने झाल्याचा त्यांचा समज असल्याने ते नाराज आहेत. निवडणुकीनंतर त्यांनी परत राष्ट्रवादीत प्रवेश केला. गेल्याच आठवड्यात राजेंद्र जगताप यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे पिंपळेगुरव भागातील अनधिकृत बांधकामांचे फोटो सादर केले. ही बांधकामे भाजपसंबंधित व्यक्तींची असल्याने, त्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आयुक्तांनी नगरसेवकांना यात हस्तक्षेप करू नये, असे पत्र काढले आणि या परिसरातील अनधिकृत बांधकामांवर हातोडा पडायला सुरुवात झाली, अशी माहितीही नागरिकांनी दिली आहे.