अवैध रेती वाहतुकीमुळे तासभर रुग्णवाहिका अडकली

0

नंदुरबार:महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील हातोडा पुलाजवळील रस्त्यावर अवैध रेती वाहतुकीमुळे तासभर १०८ रुग्णवाहिका अडकून पडल्याने गरोदर महिलाला मोठ्या यातनेला सामोरे जावे लागले. दोन्ही बाजूने रेती वाहतूक करणाऱ्या गाड्यावर त्या मधोमध रुग्णवाहिका फसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनाही मनस्ताप सहन करावा लागला. बेशिस्त वाहतुकदारांवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

तळोदा तालुक्यातील रेवानगर येथील रेखा पावरा ही महिला आठ महिन्यांची गरोदर आहे. त्यांना तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी असल्याने व पुढील उपचारार्थ त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला होता. शुक्रवारी सकाळी ११ वाजता १०८ रुग्णवाहिका तळोदा रुग्णालयातून रूग्ण महिलेस घेऊन निघाल्यानंतर अवघ्या दहा मिनिटाच्या अंतरावर महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील हातोडा पुलाजवळील रस्त्यावर अवैध वाहतूकदारांची मोठी कोंडी झाली होती. त्यामुळे १०८ रुग्णवाहिकेला पुढे जाण्यास अडचण झाले.

रुग्णवाहिकेचे चालक दिनेश पाटील यांनी वेळोवेळी सायरन वाजवत रस्ता मोकळा करा. रुग्णवाहिकेत रुग्ण उपचारासाठी पुढे जायचे आहे, असे आवाहन करून देखील मुजोर बेशिस्त वाहतूकदारांनी वाट दाखवली नाही. अनेक वेळेस प्रयत्न केल्यानंतर काही उपयोग होत नसल्याने शेवटी चालक पाटील यांनी रस्त्यावर उतरून वाहतूकदारांना विनवण्या केल्या, तरीही त्याचा काही उपयोग झाला नाही. रुग्णवाहिका आडमार्गाने जाऊ द्या, असा खोचक सल्ला रुग्णवाहिकेचे चालक दिनेश पाटील यांना बेशिस्त वाहतूकदारांनी दिला.

बेशिस्त वाहतूकदारांची मुजोरी

तासभर रुग्णवाहिका अडकून पडल्याने गरोदर रुग्ण महिलेस त्रास होत होता. तेव्हा रुग्णवाहिकेत सोबत आलेल्या डॉ.चेतन रावताळे यांनी तात्काळ तालुकास्तरीय अधिकाऱ्याला फोन केला असता, वाहतूक कोंडी असलेला रस्ता गुजरात हद्दीत येतो म्हणून हात झटकले. या रस्त्यावर नेहमी बेशिस्त वाहतूकदार मुजोरी करीत असतात. त्याचा फटका अनेकांना बसत असतो. यावर कायमस्वरूपी बंदोबस्त व्हावा, अशी मागणी भाजपचे कार्यकर्ते गोपी पावरा यांनी केली आहे.