अवैध लाकूड वाहतूक; ट्रक चालकासह ताब्यात

0

जळगाव। शिवाजीनगर परिसरातील एका सॉमीलमध्ये अवैधरीत्या ट्रकमध्ये भरून लाकूड विक्रीला आल्याची गुप्त माहिती वन विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारावरून वनपाल पवार यांनी कारवाई करून लाकडांचा ट्रक व त्याच्या चालकासह ताब्यात घेतला आहे. शनिवारी दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास शिवाजीनगर परिसरातील सॉमीलमध्ये जाऊन वन विभागाने लाकडाचा ट्रक जप्त केला आहे.

गुप्त माहितीच्या आधारे कारवाई
शिवाजीनगर परिसरातील सॉमीलमध्ये शनिवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास एरंडोल कडून एक ट्रक (क्र. एमएच-10-के-6422) जळगावकडे आला. गुजराल पेट्रोलपंपाच्या बाजुने निमखेडी रस्त्यावरून ट्रक शिवाजीनगरातील एका सॉमीलमध्ये थांबविला होता. या प्रकरणी वन विभागाच्या गस्ती पथकाने वनपाल सुनील पवार यांना अवैधरीत्या लाकूड विक्रीला आल्याची माहिती दिली. पवार त्यांच्या नातेवाईकाच्या लग्नाला गेलेले होतेे. त्यांनी लग्नाच्या ठिकाणाहून तत्काळ सॉमील गाठली.

ट्रक चालकाची उडवाउडवीची उत्तरे
त्यावेळी सरदार गुड्डुसिंग जावरीया यांच्या ट्रकमध्ये (क्र. एमएच-10-के-6422) मोठाले लाकडाचे ओंडके भरलेले दिसले. पवार यांनी ट्रक चालकाला लाकडचा परवाना विचारला. मात्र त्याच्याकडे काहीच कागदपत्रे नव्हती. लाकूड शेतातील असल्याचे फक्त त्याने सांगितले. त्यामुळे पवार यांनी ट्रक ताब्यात घेऊन वन विभागाच्या डेपोमध्ये लावला. लाकूड नेमके कुठून आणले, कोणाच्या मालकीचे आहे या सर्व बाबींची चौकशी केल्यानंतर पुढील कारवाई करणार असल्याची माहिती पवार यांनी दिली आहे.