अवैध वाळू उपसा करणार्‍या बोटी उद्धवस्त

0

दौंड । मलठण हद्दीमध्ये भीमा नदीपात्रात अहोरात्र वाळू उपसा करणार्‍या 6 फायबर आणि सेक्शन बोटी जिलेटिनच्या सहाय्याने स्फोट करून नदीपात्रात बुडवल्या. त्यामुळे या कारवाईत वाळू तस्करांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार आणि दौंडचे प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाच्या पथकाने शनिवारी ही कारवाई केली.

भीमा नदीपात्रात गेल्या अनेक दिवसांपासून अनधिकृतपणे वाळू उपसा सुरू आहे. नदीपात्रातील शेकडो ब्रास वाळूचा उपसा करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी येथील ग्रामस्थ वारंवार करत होते. महसूल पथकाने त्यावर कारवाई करत वाळू उपसा करणार्‍या बोटी जिलेटीनच्या सहाय्याने स्फोट करून पाण्यात बुडवल्या आहेत. येथील नदीपात्रात हा वाळू उपसाचा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू होता. दौंडचे निवासी नायब तहसीलदार धनाजी पाटील यांच्या पथकाने आक्रमक भूमिका घेत हा कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे या भागातील वाळू चोरांचे धाबे दणाणले आहेत.