जळगाव- गिरणा नदी पत्रात अवैध वाळू उपसा करत असतांना मंडळाधिकारी यांनी ट्रक्टर मालक आणि चालक यांना पकडून त्यांच्यावर तालुका पोलीसात गुरनं 90/2013 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी आज जिल्हा न्यायालयात कामकाज झाले असता आरोपीस तीन महिन्याची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी की, मंडळाधिकारी अशोक कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून 13 जुलै 2013 रोजी गिरणा पात्रात अवैधरित्या वाळूचा उपसा करणार्या ट्रक्टर चालक विनोद पवार आणि मालक कैलास पवार या दोघांविरूद्ध जळगाव तालुका पोलीस स्टेशनला गरनं 90/2013 भादवि 379, 34 गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान चालक विनोद पवार हा मयत झाला होता. या गुन्ह्यात फिर्यादी, पंच शेखर परदेशी, साक्षीदार ज्ञानेश्वर बागुल आणि तपासाधिकारी जगदीश चौधरी या चार जणांची साक्ष तपासण्यात आली. जिल्हा सत्र न्यायालयाने चालक आणि मालक यांना दोषी ठरवत प्रत्येकी तीन महिन्याची शिक्षा आणि तीन हजार रूपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिन्याची साधी कैद देण्यात आली आहे. सरकार पक्षातर्फे अॅड.निखिल कुलकर्णी आणि अॅड.सुप्रिया क्षिरसागर तर आरोपीतर्फे अॅड. जयंत मोरे यांनी कामकाज पाहिले.