चिंचोली-आडगाव रस्त्यावर ट्रॅक्टरची अॅपे रीक्षाला धडक ; जमावाने ट्रॅक्टर जाळत रुग्णवाहिकेसह पोलिस चौकीवर केली दगडफेक
यावल- अवैध वाळू वाहतूक करणार्या ट्रॅक्टरने शाळकरी विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्या अॅपे रीक्षाला धडक दिल्याने दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास मनुदेवी फाटा ते आडगाव रस्त्यावर घडली. या घटनेनंतर संतप्त जमावाने विद्यार्थ्यांचे बळी घेणार्या ट्रॅक्टरला आग लावत रस्ता रोको केला. घटनास्थळी उशिराने 108 रुग्णवाहिका दाखल झाल्याने संतप्त जमावाने या वाहनावर तसेच पोलिस चौकीसह पोलिसांवर दगडफेक केली. या अपघातात राका ईस्माईल तडवी (14, आडगाव) व दीपक अरुण पाटील (14, कासारखेडा) या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.
अॅपे रीक्षावर धडकला ट्रॅक्टर
गुरूवारी सकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास यावल-चोपडा रस्त्यावरील मनुदेवी फाट्याजवळ अॅपे रीक्षा (एम.एच.19 एई-9220) चिंचोली विद्यालयातील विद्यार्थ्यांची भरधाव वेगात वाहतूक करीत असताना मनुदेवी फाट्यापासून आडगावकडे वाळूने भरधाव वेगाने जात असलेले ट्रॅक्टर (एम.एच.19 सीजी 493) च्या विना नंबरच्या ट्रॉलीने रीक्षास कट मारल्याने अॅपे रीक्षातील इयत्ता आठवीचा राका इस्माईल तडवी व दीपक अरूण पाटील हे दोन्ही विद्यार्थी रस्त्यावर खेचले जावून खाली पडले व डोक्याला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मयत हे कुटुंबियांचे एकुलते एक असल्याने कुटुंबियांचा आक्रोश मन हेलावणारा होता. अपघातानंत ट्रॅक्टरचालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.
ट्रॅक्टर पेटवले, प्रचंड दगडफेक
मनुदेवी फाट्यावर पोलीस चौकी बंद असल्यानेया पोलीस चौकीचे दरवाजे, खिडक्या जमावाने तोडल्या तसेच पोलिस गाडीसह पोलिसांवर दगडफेक केली. जमाव शांत करण्यास चिंचोलीचे अनिल साठे, निलेश साळुंके, बाबा महाहंसजी महाराज, आडगावचे पोलीस पाटील शांताराम पाटील, कासारखेडा सरपंच भागवत पाटील,संजय साळुंके, विश्श्वदिप पाटील यांनी सहकार्य केले. घटनेनंतर प्रशासन उशिरा पोहोचल्याने नागरीकांनी संताप व्यक्त केला. तहसीलदार कुंदन हिरे पोलिस उपअधीक्षक राजेंद्र रायसिंग, पोलिस निरीक्षक डी. के. परदेशी यांनी घटनास्थळी पोहचून जमावास दोषीवर कडक कारवाईचे आश्श्वासनानंतर जमाव शांत झाला. अज्ञात ट्रॅक्टर चाकासह अॅपे चालक बशरत हैदर तडवी (रा.आडगाव) यांच्याविरूध्द धरधाव वेगात वाहने चालवून विद्यार्थ्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सायंकाळी उशिरा दोघा मृत विद्यार्थ्यांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.