Round-the-clock illegal transport of sand in Raver taluka: Silence of revenue administration रावेर : रावेर तहसील कार्यालया समोरून अहोरात्र वाळूची सर्रास वाहतूक सुरू आहे. भोकर नदी पात्रातून दररोज हजारो ब्रास अवैध वाळूचे उत्खनन सुरू असल्याने तहसील प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सुज्ञ पर्यावरणप्रेमी करीत आहेत. रावेर तालुक्यातील भोकर नदी पात्रातून दररोज शेकडो ब्रास अवैध वाळूचे उत्खनन केले जात आहे. ही वाहतूक दिवस-रात्र सुरू असताना प्रशासन त्याबाबत कारवाई करण्याचे धाडस का दाखवत नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जळगाव जिल्ह्यातील नदीपात्रातून वाळू वाहतुकीला स्पष्ट बंदी असतांनादेखील रावेरात मात्र वाळू व्यावसायीकांवर महसूल प्रशासन बेहरबान असल्याची टिका होत आहे. प्रांतधिकारी कैलास कडलग यांनी लक्ष देण्याची मागणी पर्यावरण प्रेमींकडून होत आहे.
परवान्यांची माहिती देण्यात टाळाटाळ
दरम्यान तहसील कार्यालयातून 2018 मध्ये गौण खनिज वाहतुकीसाठी देण्यात आलेल्या परवान्यांची पायमल्ली झाल्याचे वृत्त आहे. या दरम्यान तहसील कार्यालयामार्फत देण्यात आलेल्या सर्व परवान्यांची तसेच भरलेल्या चलनांच्या पावत्यांची एका समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी होत आहे. समजलेल्या माहितीनुसार 2018 मध्ये गौण खनिज वाहतूक करण्यासाठी देण्यात येणार्या परवान्यांमध्ये महसूल नियमांची पायमल्ली झाली आहे. काही परवाने चलन न भरता गौण खनिज वाहतूक दारांना सर्रास वाहतूक करण्यासाठी देण्यात आले. विशेष म्हणजे दिलेले परवाने विना चलनाचे होते. या संदर्भात स्थानिक प्रतिनिधी यांनी महसूल लिपिक यांच्याकडून 2018 दरम्यान देण्यात आलेल्या चलना संदर्भात माहिती विचारली असता माहिती दिली जात नाही.