अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त : दोघांविरोधात गुन्हा

चाळीसगाव : चाळीसगावातील महसूल प्रशासनाने अवैधरीत्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त केले असून या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसात ट्रॅक्टर चालक आणि मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. अवैध वाळू वाहतूक सध्या तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे.

अवैध वाळू वाहतूक ऐरणीवर
चाळीसगाव तालुक्यातील सांगवी-तळोंदा रस्त्यालगत रात्री चोरटी वाळूची वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती चाळीसगाव महसूल विभागाला मिळाल्याने भामरेचे तलाठी बाबुलाल शेळके, पिलखोडचे तलाठी निलेश अहिरे आणि सायगावचे तलाठी गणेश गढी यांच्यासह ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार राजेंद्र साळुंखे, पोहेकॉ नितीन सोनवणे, पो.ना. शंकर जंजाळे, संदीप माने, मनोज पाटील यांनी 7 मार्च रोजी रात्री कारवाई केली. सांगवी-तळोंदा रस्त्यालगत अवैध वाळूची वाहतूक करणारे विना नंबरचे ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त करण्यात आली तर ट्रॅक्टर चालक महादू भिकन सोनवणे (22) व ट्रॅक्टर मालक एकनाथ शंकर राठोड (53, दोन्ही रा.सांगवी, ता.चाळीसगाव) यांच्याविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.

वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
वाळूने भरलेले ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक मनोज पाटील करीत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास गावडे यांच्या सुचनेनुसार करण्यात आली.