अवैध व्यवसायांविरुद्ध मोहिम तीव्र करण्याचे पोलिस उपअधीक्षकांचे आदेश

0

भुसावळ- शहरासह तालुक्यात अवैध व्यवसायाविरुद्ध जोमाने कारवाई करण्याचे आदेश पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांनी शहरातील तीनही पोलिस ठाण्यांच्या अधिकार्‍यांना दिले आहेत. कुठल्याही पोलिस ठाण्याच्या हद्दित सट्टा, पत्ता, जुगार आदी मिळून आल्यास संबंधित अधिकार्‍यांना जबाबदार धरण्यात येईल. अशा सक्त सूचना डीवायएसपी गजानन राठोड यांनी शनिवारी झालेल्या गुन्हे आढावा बैठकीत दिल्या आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक दत्ता शिंदे यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायाविरूध्द कारवाई करण्याचे आदेश दिले असून त्यानंतरही व्यवसाय सुरू असल्यास संबंधित पोलिस ठाण्यातील अधिकार्‍याची बदली करण्याचा इशारा दिला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर राठोड यांनी रविवारी बैठक घेतली. शहर पोलिस ठाणे, बाजारपेठ पोलिस ठाणे, तालुका पोलिस ठाणे आणि नशिराबाद पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात कारवाई करण्याच्या सूचना डीवायएसपी राठोड यांनी दिल्या. बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक देविदास पवार, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे आणि तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी सक्त कारवाईचे आदेश दिले आहेत.