अव्वल राहिल्यास भारतीय संघाला मिळणार १० लाख डॉलर्स!

0

नवी दिल्ली: आगामी कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला हरवल्यास टीम इंडियाला आयसीसीकडून १० लाख डॉलर्सचे बक्षिस मिळणार आहे. कसोटी क्रिकेट क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखल्याबद्दल हे आयसीसीकडून टीम इंडियाला हे बक्षिस देण्यात येणार आहे. आयसीसीच्या मानांकनात सर्वोच्च स्थानी राहण्यासाठी आणि बक्षिसावर दावा सांगण्यासाठी १ एप्रिल २०१७ ची अंतिम मुदत आहे. त्यामुळे पहिल्या कसोटीत भारताने विजय संपादन केला, तर टीम इंडिया सर्वोच्च स्थानी कायम राहून संघाला बक्षिसाच्या रकमेवर दावा करता येईल.

बक्षिसाची रक्कम वाढली

बक्षिसाची ही रक्कम यापूर्वी ५ लाख डॉलर्स इतकी होती. मात्र, २०१५ पासून बक्षिसाची रक्कम १० लाख डॉलर्स इतकी करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला असून याठिकाणी ते चार कसोटी सामने खेळणार आहेत. भारतीय संघाने ऑक्टोबर महिन्यात न्यूझीलंडचा पराभव करून टेस्ट क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले होते. भारताने न्यूझीलंडला ३-० आणि इंग्लंडला ४-० अशा व्हाईटवॉश दिला होता. नुकत्याच झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताने २०८ धावांनी विजय मिळवला होता. त्यामुळे गेल्या चार महिन्यांमध्ये भारतीय संघाने सलग १९ सामने जिंकले आहेत.

टीम इंडिया फॉर्ममध्ये

भारतीय संघ सध्या अतिश्य चांगल्या फॉर्ममध्ये असून सलग १९ सामन्यांमध्ये विजयी ठरला आहे. मात्र, येत्या २३ तारखेपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध पुण्यात सुरू होणाऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवल्यास भारतीय संघाला १० लाख डॉलर्स मिळतील. बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटीसाठीचा भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध देखील कायम ठेवण्यात आला आहे. येत्या २३ फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघाची पहिली कसोटी खेळविण्यात येणार आहे. पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर पहिला सामना होणार आहे.