अव्वल स्थानासाठी भारताला एकतर्फी विजयाची आवश्यकता

0

दुबई । यजमान भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला 17 सप्टेंबरपासून प्रारंभ होत आहे. आयसीसीच्या विद्यमान एकदिवसीय क्रिकेटच्या मानांकन यादीत दक्षिण आफ्रिका 119 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी समान प्रत्येकी 117 गुण घेतले असले तरी स्टीव्ह स्मिथचा ऑस्ट्रेलियन संघ काही शतांश गुणांच्या फरकाने दुसर्‍या स्थानावर आहे. आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ही एकदिवसीय क्रिकेट सामन्यांची मालिका भारताने 4-1 अशा फरकाने जिंकली तर भारताला पहिल्या स्थानावर झेप घेता येईल. भारताने या आगामी मालिकेत ऑस्ट्रेलियाचा 5-0 असा पराभव केला तर भारताला 122 तर ऑस्ट्रेलियाचे 113 गुण राहतील. भारताने ही मालिका 4-1 अशी जिंकली तर भारताला 120 गुण तर ऑस्ट्रेलियाला 114 गुण मिळतील. भारताने ही मालिका 3-2 अशी जिंकली तर भारताचे 118 तसेच ऑस्ट्रेलियाचे 116 गुण होतील. ऑस्ट्रेलियाने या मालिकेत भारताचा 3-2 असा पराभव केला तर ऑस्ट्रेलिया 118 तर भारत 116 गुणांवर राहील. ऑस्ट्रेलियाने या मालिकेत 4-1 असा पराभव केला तर ऑस्ट्रेलिया 120 तसेच भारत 114 गुणांवर राहील. ऑस्ट्रेलियाने या मालिकेत भारताचा 5-0 असा पराभव केल्यास ऑस्ट्रेलिया 122 तर भारत 112 गुणांवर राहील.

पहिला एकदिवसीय सामना 17 सप्टेंबररोजी चेन्नईत, दुसरा एकदिवसीय सामना 21 सप्टेंबर कोलकात्यात, तिसरा एकदिवसीय सामना 24 सप्टेंबर इंदोरमध्ये, चौथा एकदिवसीय सामना 28 सप्टेंबर बेंगळूरुत, पाचवा एकदिवसीय सामना 1 ऑक्टोबरला नागपूर येथे होणार आहे.