अशाने सामान्यांना न्याय मिळेल?

0

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याची सुरुवात दुपारी एक वाजेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज बंद होण्याचेच झाली. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावरील कथित ऑडिओ क्लीपबाबत मागच्या आठवड्यात गदारोळ झाल्यानंतर गेल्या तीन चार दिवसात व्हायरल झालेल्या त्यांच्याच कथित दुसऱ्या ऑडियो क्लिपमुळे दुसऱ्या आठवड्याची ओपनिंग देखील निराशाजनक झाली. काहीही महत्वाची कामकाज न होता दोन्ही सभागृह बंद झाली. त्या क्लिप संबंधी स्वतः धनंजय मुंडे यांनी पोलीसात तक्रार केली आहे.

ज्यांच्यावर आरोप आहेत ते स्वतः तक्रार दाखल करून कारवाई करण्याबाबत बोलत असतील तर सत्ताधारी पक्षाने गोंधळ करून सभागृह बंद पाडणे कितपत योग्य आहे? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. अर्थात मुंडे आणि विरोधी पक्षाने याआधी सत्ताधारी काही मंत्र्यांच्या सीडी व ऑडियो क्लिप्स आल्यानंतर जोरदार आवाज करत अतातायीपणा दाखवत सभागृह बंद पडली होतीच म्हणा. पण खुद्द मुख्यमंत्री अध्यक्ष, सभापती, विरोधी पक्षनेते, सभागृह नेते यांची एकत्रित समिती तयारी करावी अन एकत्रित चौकशी करावी असे निवेदन देतात आणि विरोधी पक्षातील महत्वाचे नेते अजित पवार मुख्यमंत्र्यांची सूचना मान्य आहे असं म्हणत या प्रकरणाची चौकशी करा म्हणतात. तरीही सत्ताधारी आमदार वेलमध्ये उतरून घोषणाबाजी करत गदारोळ करतात. आणि अध्यक्ष सभागृह संपूर्ण दिवसासाठी सभागृह बंद करण्याची घोषणा करतात.

हे चित्र खरोखर सामान्य लोकांच्या दृष्टीने चिंताजनक आहे. सामान्यांच्या प्रश्नांवर चर्चा व्हावी त्यांना न्याय मिळावा यासाठी अधिवेशनाचा डोलारा चालतो. मात्र इथे अगदीच खेळीमेळीने आणि सोईस्करपणे कुठल्याही प्रश्नांवर चर्चा न करता एक-एक दिवस पुढे ढकलण्याचा प्रकार चालला असल्याचे चित्र आहे. शेतकरी मंत्रालयापर्यंत येऊन आत्महत्या करत आहेत, बोंडअळी, गारपिट आणि अनेक समस्यांनी शेतकरी खचून चाललाय, बेरोजगारी वाढत चाललीय, महागाईने जनता त्रासलीय, राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चाललेय, शिक्षण, आरोग्याच्या अनेक समस्या आणि प्रश्न समोर उभे ठाकले असताना त्यावर चर्चा होण्याऐवजी काहीतरी कारणांनी सभागृहाचे कामकाजच बंद पाडले जात आहे. मुख्यमंत्री स्वतः उठून चौकशीसाठी समिती गठीत करण्याची मागणी करत असताना त्यांच्याच पक्षाचे सदस्य प्रचंड गदारोळ करून सभागृह बंद पाडतात हे चित्र काहीसे न पटणारे आहे. खरोखर सत्ताधारी पक्षाकडे सामान्यांच्या प्रश्नाची उत्तरे नाहीत का? असाही सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय.

बाकी आज चंद्रकांत दादांची संघनिष्ठा सभागृहात दिसून आली. कपिल पाटलांनी परिचारिकांच्या मुद्द्यावरून विचारधारेवर प्रश्नचिन्ह उभे केल्यावर चंद्रकांत दादा ज्या प्रकारे त्यांच्यावर धावून गेले त्यावरून त्यांची संघनिष्ठा प्रकर्षाने दिसून आली. सभागृह चालविण्यासाठी असलेले सभागृह नेतेच जर सदस्यांना अरे-तुरेची भाषा करतात आणि धावून येतात हे चित्र जरा विचित्रच आहे.

– निलेश झालटे