ऋग्वेदात शिक्षणाची व्याख्या, मानवाला जे स्वावलंबी व स्वार्थनिरपेक्ष बनवते ते म्हणजे शिक्षण अशी केली आहे. घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीदेखील शिक्षणाची व्याख्या, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो कोणी याला प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, अशी केली आहे. शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
पुस्तकीय शिक्षणाबरोबरच व्यावहारिक शिक्षणालादेखील मानवी जीवनात खूप महत्त्व आहे. केवळ पुस्तकाची घोकंपट्टी करून शिक्षण मिळवणारेच योग्य जीवन जगू शकतात असे नाही, तर व्यवहारिक ज्ञानाच्या जोरावर उत्तमरीत्या जीवन जगत असल्याची अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. किमान साक्षरतेसाठी शिक्षण असणे आजच्या काळाची गरज बनली आहे. आधुनिक युगात तंत्रज्ञानक्षेत्रात मोठी क्रांती झाली आहे. तंत्रज्ञानाने मानवाला शिक्षित केले असे असले तरी अद्यापही साक्षरतेचे प्रमाण खूप कमी आहे. यावर विचारमंथन होणे गरजेचे आहे. असो, पण कधी कधी अशिक्षितपणा हा मानवाच्या जीवावर उठू शकतो याचा प्रत्यय एका प्रसंगातून आला. आठवड्याभरापूर्वी मित्राच्या आईला वैद्यकीय तपासणी करण्यासाठी जळगाव शहरातील एका मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये आणले होते. मित्रासोबत मी पण होतो. वैद्यकीय तपासणी सुरू असताना त्या ठिकाणी पन्नाशीतला एक गृहस्थ हा त्याच्या पत्नीला छातीत दुखत असल्याने एरंडोल येथील प्रथमोपचार करणार्या डॉक्टराच्या सल्ल्याने खासगी हॉस्पिटलला घेऊन आला. हे खासगी हॉस्पिटल शहरातील एक नामांकित हॉस्पिटल असून रुग्णांची संख्या मोठी असते. हा गृहस्थ अशिक्षित होता. त्याला काहीही उमजेना. रुग्णालयातील वर्दळ पाहून गृहस्थ चक्रावला. त्यात तो पडला अहिराणी भाषिक. तिथल्या बहुतांश कर्मचार्यांना अहिराणी भाषेतील काही शब्द समजेना. त्यामुळे या गृहस्थाचे म्हणणे काय आहे ते कुणालाच कळत नव्हते. त्याला चक्रावलेल्या अवस्थेत बघून आम्ही त्यांना विचारणा केली असता त्यांनी संबंधित बाब सांगितली. माणुसकीच्या नात्याने आम्ही त्यांना काय करायचे याविषयी सांगितले. त्यांच्या पत्नीला हृदयविकाराचा झटका आलेला होता. अॅन्जिओग्राफी केली त्यात हृदयाला रक्तपुरवठा करणार्या मुख्य धमणीत 1 ब्लॉकेज असल्याचे निष्पन्न झाले. डॉक्टरांनी रुग्णांच्या जीवाला धोका असल्याने लागलीच शस्त्रक्रिया करण्यासंबंधी सल्ला दिला. शस्त्रक्रियेसाठी खर्च देखील मोठा येणार होता. मात्र, दारिद्य्ररेषेखालील असल्याने राजीव गांधी आरोग्यदायी योजनेंतर्गत मोफत शस्त्रक्रिया होणार होती. शस्त्रक्रियेची तयारी झाली. रुग्णाला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाण्याअगोदर आवश्यक कागदपत्रांची तपासणी केली असता कागदपत्रावरील मूळ नावात तफावत आढळून आल्याने डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याअगोदरच कागदपत्रासंबंधित बाब त्या गृहस्थाच्या लक्षात आणून दिली. तत्काळ शस्त्रक्रिया थांबवण्यात आली आणि पैसे भरावे लागतील असे सांगितले. गरिबीमुळे इतकी मोठी रक्कम ते भरू शकत नव्हते, तर दुसर्या बाजूने रुग्ण गंभीर अवस्थेत… अशा परिस्थितीत गृहस्थ हतबल होऊन रडू लागला. त्याच्यासोबत कोणीही नव्हते. गृहस्थाला एकही मुलगा नव्हता. चारही विवाहित मुली होत्या. जर हा गृहस्थ शिक्षित असता तर त्याच्यावर हतबल होण्याची वेळ आली नसती. यावरून शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे दिसून येते.
ऑल द बेस्ट…!
प्रदीप चव्हाण – 9503484491