जळगाव । येथील ज्येष्ठ कवी तथा ललित लेखक अशोक कोतवाल यांना नागपूर येथील आकांक्षा प्रकाशन आणि स्व. कवी श्रीधर शनवारे यांचे कुटूंबीय, यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा “कवी श्रीधर शनवारे स्मृती काव्य पुरस्कार” जाहीर झाला आहे. समकालीन मराठी काव्य प्रवाहात लक्षणीय भर घालणार्या काव्यकृतीला हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो.
या वर्षीचा हा पुरस्कार अशोक कोतवाल यांच्या ‘नुसताच गलबला’ या काव्यसंग्रहास देण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरुप रोख रुपये एकवीस हजार, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे आहे. 5 ऑक्टोबर 2017 रोजी नागपूरात एका विशेष समारंभात त्यांना हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येईल. अशोक कोतवाल हे नव्वदोत्तरी कालखंडातील एक महत्वाचे कवी असून आतापर्यंत त्यांचे चार काव्यसंग्रह, दोन ललित लेखसंग्रह प्रकाशित झालेले आहेत.