जयपूर: राजस्थानमधील राजकारण सध्या संपूर्ण देशात चर्चेचा विषय झाला आहे. सचिन पायलट यांनी बंडाचा झेंडा हाती घेतल्याने कॉंग्रेस अडचणीत सापडले होते. कॉंग्रेसने सचिन पायलट यांच्यावर कारवाई करत त्यांना उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष पदावरून दूर केले. मात्र सचिन पायलट यांच्यामागे भाजपचे षडयंत्र असल्याचे आरोप वारंवार होत आहे. तसेच मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या जवळच्या नातेवाईक, व्यापारी, उद्योजकांवर ईडीकडून छापेमारी झाली आहे. त्यामुळे भाजपकडून हेतुपुरस्सर असे केले जात असल्याचे आरोप होत आहे. दरम्यान मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या भावाच्या कंपनीवर ईडीकडून छापा टाकण्यात आला आहे. कथित खत घोटाळा प्रकरणी ईडीकडून हा छापा टाकण्यात आला आहे. आज बुधवारी सकाळी वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले जात आहेत. यामध्ये अशोक गेहलोत यांचा भाऊ अग्रसेन गेहलोत यांच्या भावाच्या कंपनीचाही समावेश आहे.
ईडीकडून जोधपूरमधील अनुपम कृषी कंपनीवर छापा टाकण्यात आला आहे. ही कंपनी अशोक गेहलोत यांचे भाऊ अग्रसेन गेहलोत यांच्या मालकीची आहे. याआधी १३ जुलै रोजी आयकर विभागाकडून मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या निकटवर्तीय सहकाऱ्यांवर छापे टाकण्यात आले होते. काँग्रेस नेते धर्मेंद्र राठोड यांच्या निवासस्थानावर छापा टाकला होता. धर्मेंद्र राठोड हे अशोक गेहलोत यांचे निकटवर्तीय समजले जातात.