मुंबई: राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस मिळून सरकार स्थापन झाले असून, शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. सरकार स्थापन होऊन १० दिवस झाले आहे. मात्र अद्याप मंत्रीमंडळाचा विस्तार झाला नसून नेत्यांची मंत्रीपदे ठरलेली नाहीत. मंत्रीपद निश्चित करण्यात काँग्रेससमोर पेच असून अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण या दोन माजी मुख्यमंत्र्यांना कोणतं मंत्रीपदं द्यायचा हा यक्ष प्रश्न उभा ठाकला आहे. यावर अशोक चव्हाणांनी स्वपक्षासह शिवसेनेलाही इशारा दिला आहे.
एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही भूमिका मांडली. अनेक नेते पक्षात आहेत, जे चांगले काम करतात. ते निर्णय घेतात आणि आम्ही त्यामागे फरफटत चाललोय असे व्हायला नको. आमचीही मते आहेत, निर्णय प्रक्रीयेत आमचाही आवाज महत्वाचा आहे. खातेवाटपाचा निर्णय मुख्यमंत्र्यांना घ्यायचा आहे. तिन्ही पक्षांना वाटत आहे की एक विभाग त्यांच्याकडेच असावा. यावरून चर्चा सुरू आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.
अशोक चव्हाण किंवा पृथ्वीराज चव्हाण यांना मंत्रीमंडळात घ्यावे की नाही हा विषय नाहीय. काँग्रेस पक्ष फरफटत जाऊ नये यासाठी ज्येष्ठ नेते असावेत. कॉमन मिनिमम प्रोग्रॅमची चौकट पाळणे गरजेचे आहे. जेव्हा आम्हाला वाटेल की चौकटीच्या बाहेर चाललेय तेव्हा आम्ही निर्णय घेण्यास स्वतंत्र आहोत, असा सूचक इशारा अशोक चव्हाणांनी दिला आहे.