पुणे । जैन इरिगेशन कंपनी ही कृषी विकासाकरीता नेहमीच क्रांतीकारी संशोधन करीत असते. कंपनी करीत असलेले कृषी विकासा विषयक कामगिरी ही राज्यासह देशातील शेतकर्यांसाठी नवसंजिवनी ठरत आहे. कृषी विकासात केलेल्या भरीव कामगिरीबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांना ’एक्सलन्स इन आंत्रप्रेन्युअरशिप’(मॅक्सेल) पुरस्कार प्रदान करण्यात आला. सूक्ष्म ठिबकसिंचन, पाइप्स, प्रक्रिया केलेली कृषी उत्पादने, टिश्यू कल्चर सौर पंप आदी क्षेत्रामध्ये केलेल्या अभूतपूर्व योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. शुक्रवारी 5 रोजी पुण्यात झालेल्या कार्यक्रमात माजी पंतप्रधान डॉ.मनमोहसिंग यांचे सल्लागार सॅम पित्रोदा यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
उच्च तंत्रज्ञानाची जोड हवी
सॅम पित्रोदा म्हणाले की, शेती, दुग्धोत्पादनाला उच्च तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यावर विक्रमी उत्पादन घेता येईल. तंत्रज्ञानाचा फायदा शेतकर्यांनी घेतला पाहिजे. तंत्रज्ञानाचा उपयोग केल्यास कृषी क्षेत्रातील उत्पादन वाढीसाठी मदत होईल असे मत भारतीय दुरसंचार आयोगाचे संस्थापक तथा प्रथम चेअरमन सॅम पित्रोदा यांनी व्यक्त केले.
पुरस्कार शेतकर्यांना अर्पण
शेतकरी हा उभ्या जगाचा पोशिंदा आहे. भारतात 12कोटींहून अधिक अल्पभूधारक शेतकरी आहे. या शेतकर्यांना उच्च कृषी तंत्रज्ञाना पुरवून त्यांच्या उत्पन्नात भर घालण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. मिळालेला हा पुरस्कार शेतात राबणार्या माझ्या कष्टकरी शेतकर्यांना अर्पण करणार असल्याचे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक भवरलाल जैन यांनी सांगितले. जैन यांच्यासह राज्यातील उद्योजकांना मॅक्सेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. हे पुरस्कार मागील 6 वर्षापासून देण्यात येत आहे.
इतर उद्योजकांचा सन्मान
पुण्यात मॅक्सेल पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी सुपर रेलिगेअर लॅबोरेटरीजचे अध्यक्ष डॉ. अविनाश फडके, शिवराय टेक्नॉलॉजीजचे सीईओ संजय बोरकर, संतोष शिंदे, चेतना पवार, चित्रा मेटे यांना ही पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची दखल घेत त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. नॅसकॉमचे माजी अध्यक्ष किरण कर्णिक यांना देखील मॅक्सेल जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
प्रास्ताविक मॅक्सेल फाउंडेशनचे संस्थापक विश्वस्त तसेच कार्पोरेट लॉयर नितीन पोतदार यांनी केले. पोतदार यांनी पुरस्कार देण्यामागची भूमिका विशद केली. सूत्रसंचालन अजित भोळे यांनी केले. नितीन पोतदार, किरण कर्णिक आणि ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर उपस्थित होते. पुरस्कार्थीच्या कार्याचे ध्वनिफीत दाखविण्यात आले. जगभरात नावाजलेल्या जैन उद्योग समूहाच्या ध्येयाप्रती समर्पित कार्यनिष्ठेला या पुरस्कारातून आणखी एक पावती मिळाली आहे. बाजारपेठेतील बदलत्या परिस्थितीत या समूहाचे काम इतरांसाठी आदर्श आहे.