मुंबई : अश्लील चित्रपट निर्मितीप्रकरणी व्यावसायिक, अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्राला कोर्टाने सुनावली २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याला अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणी सोमवारी रात्री अटक झाली. फेब्रुवारी महिन्यात मढ परिसरातल्या एका बंगल्यावर टाकलेल्या छाप्यामध्ये अश्लील चित्रपट निर्मिती सुरू असल्याची माहिती मुंबई पोलिसांना कळाली. या प्रकरणाचा तपासाचा एक भाग म्हणून सोमवारी राज कुंद्राला अटक करण्यात आली.
आज राज कुंद्रा आणि दुसरा आरोपी रायन जॉन मायकल थार्प (४३) या दोघांना न्यायालयात हजर केलं असता त्या दोघांची २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. यापैकी राज कुंद्राला सोमवारी रात्री तर थार्पला आज सकाळी अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रकरणात १२ जणांना अटक करण्यात आली आहे. इतर दहा आरोपी जामिनावर मुक्त आहेत.
राज कुंद्रा या संपूर्ण प्रकरणाचा मास्टर माइंड
मुंबई क्राइम ब्रांचने म्हटले आहे, की राज कुंद्रा या संपूर्ण प्रकरणाचा मास्टर माइंड आहे. राज कुंद्रा आणि ब्रिटेनमध्ये राहणाऱ्या त्याच्या भावाने केनरिन नावाची एक कंपनी बनवली आहे. यावर पोर्न फिल्म्स बघितल्या जातात. या फिल्म्सचे व्हिडिओज भारतात शूट केले जात होते आणि ते WeTransfer च्या माध्यमाने परदेशात पाठविले जात होते. पोलिसांनी म्हटले आहे, की त्यांच्याजवळ राज कुंद्राविरोधात पुरेसे पुरावे आहेत. पोलिसांनी व्हिडिओ अपलोड करणाऱ्या उमेश कामथलाही अटक केली आहे.
७ वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद
व्हिडीओ, ऑडिओ आणि इतर स्वरूपात अश्लीलतेचा आणि लैगिंक शोषणाचा प्रसार करणारं साहित्य तयार करणं वा इतरांना पाठवणं पोर्नोग्राफी प्रतिबंध कायद्याने गुन्हा आहे. अश्लील व्हिडीओ बनवणंही गुन्हा असून, चाईल्ड पोर्नोग्राफी बघणंही गुन्हा ठरवण्यात आलेलं आहे. या प्रकरणात दोषी आढळल्यास सुधारित माहिती तंत्रज्ञान कायदा २००८ मधील कलम ६७ (अ) आणि भादंवि कलम २९२, २९३, २९४, ५००, ५०६ आणि ५०९ यानुसार शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. या प्रकरणी पहिल्यांदाच दोषी आढळलेल्या आरोपीला ५ वर्षांचा तुरुंगवास किंवा १० लाखांचा दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. दुसऱ्यांदा असा गुन्हा केल्यास ७ वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे.