अश्‍विनी बिद्रेंची हत्याच?

0

मृतदेह कुरूंदकरने भाईंदरच्या खाडीत फेकला

मुंबई : बेपत्ता महिला पोलिस अधिकारी अश्‍विनी बिद्रे यांची पोलिस निरीक्षक अभय कुरूंदकरने हत्या करून मृतदेह भाईंदरच्या खाडीत फेकला असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. 11 एप्रिल 2016 रोजी सायंकाळी 7 ते 11 या वेळेत हत्या झाली आणि भाईंदर खाडी परिसरात कुरूंदकरच्या मोबाईलचे टॉवर लोकेशन दाखवत आहे. तर, बिद्रे यांचा मोबाईल त्याच रात्री 11 च्या सुमारास बंद झाल्याचे तपासात निष्पन्न झाला आहे. या कामात कुरूंदकरला एका साथीदाराने मदत केल्याचेही स्पष्ट झाले आहे.

मृतदेह खाडीत फेकल्याचा संशय
42 वर्षीय अश्‍विनी बिद्रे नवी मुंबई पोलिसांच्या मानवाधिकार विभागात कार्यरत होत्या. गेल्या दीड वर्षापासून त्या बेपत्ता आहेत. 11 एप्रिल 2016 रोजी सायंकाळी सातच्या सुमारास बिद्रे या कुरूंदकराला पोलिस ठाण्यात भेटायला आल्या. यानंतर अभय कुरूंदकर हे बिद्रे यांना कारमध्ये घेऊन भाईंदरच्या दिशेने गेले. याच दरम्यान कुरूंदकरने बिद्रे यांची कारमध्ये गळा दाबून किंवा गोळी झाडून हत्या केल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. त्यानंतर रात्री 11.18 वाजता बिद्रे यांचा मोबाईल बंद झाल्याचे दाखवत आहे. ज्या वेळेस बिद्रे यांचा मोबाईल स्वीच ऑफ झाल्याचे दाखवत आहे त्याचवेळी अभय कुरूंदकरने त्याच्या साथीदाराला फोन केल्याचे निष्पन्न झाले आहे. कुरूंदकरने फोन करताच तो त्यांना भेटायला गेला. यानंतर दोघांनी रात्री अश्‍विनी बिद्रेचा मृतदेह कारमधून काढून खाडीत फेकल्याचा पोलिसांना संशय आहे.

कुरूंदकर-बिद्रेंचे विवाहबाह्य संबंध
ठाणे ग्रामीणचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर याचे अश्‍विनी बिद्रे यांच्याशी विवाहबाह्य संबंध होते. कुरूंदकर यास पत्नी व दोन मुले आहेत. मात्र, बिद्रे यांनी कुरुंदकर याच्या मागे लग्नाचा तगादा लावला होता. त्यावरुनच कुरुंदकर आणि बिद्रे यांच्यात रोजच भांडणे होत होती. बिद्रे यांचे पतीशी पटत नव्हते. त्यांना एक मुलगी आहे. जी पित्याकडे राहते. कुरूंदकर पहिल्या पत्नीला व मुलांना सोडू शकत नव्हता तर दुसरीकडे बिद्रे यांनी लग्नाचा तगादा लावल्याने त्याने बिद्रे यांचा काटा काढल्याची शक्तता पोलिसांनी वर्तविली आहे.