अश्‍विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणी खडसेंच्या भाच्याची चौकशी

0

नवी मुंबई । सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्‍विनी गोरे (बिद्रे) बेपत्ता प्रकरणी अटक करण्यात आलेल्या ठाणे सुरक्षा शाखेमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरूंदकरला पोलीस कोठडी सुनावण्यात आली असतांनाच त्याच वेळी पोलिसांनी एकनाथ खडसेंचे भाचे ज्ञानेश्‍वर ऊर्फ राजेश पाटील यालाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. वरणगाव पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आल्या नंतर राजेश पाटील याला जळगावातून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्याची कसून चौकशी करण्यात येत असून लवकरच या संबंधी माहिती समोर येईल, असे सहायक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड यांनी सांगितले.

राजेश पाटीलच्या अटकेमुळे प्रकरणाला वेगळी कलाटणी
ही घटना घडली तब्बल दीड वर्षांपूर्वी तेव्हापासून एपीआय बिद्रे या बेपत्ता आहेत. यापूर्वीच गुरुवारी अभय कुरुंदकरला अटक करण्यात आली आहे.पनवेल पोलिसांनी ठाण्यातून अभय कुरुंदकरला अटक केली होती. न्यायालयात हजर केले असता त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. अभय कुरुंदकरला अटक झाल्यानंतर लगेच मोठ्या राजकीय नेत्याशी संबंधित व्यक्तीला या प्रकरणी ताब्यात घेण्यात आल्याने सदर प्रकरणाला वेगळी कलाटणी लागण्याची शक्यता आहे तर यात अजून काही बडे व्यक्ती सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद
राजेश पाटील हा अभय कुरुंदकर यांचा मित्र असल्याचे समोर येत आहे. अश्‍विनी बेपत्ता झाल्या त्या काळात कुरुंदकर आणि या दोघात मोबाईलवर संभाषण झाले होते. कुरुंदकरांच्या सीडीआरवरून हे निष्पन्न झाले. बेपत्ता प्रकरणात राजेश पाटील यांचा संबंध असल्याचा पोलिसांचा संशय आहे. पण राजेश पाटील याला अटक नाही तर चौकशीसाठी नेल्याचा पोलिसांनी खुलासा केला आहे. वरणगाव पोलीस स्टेशनला नोंद करून नवी मुंबई पोलिसांनी नेले आहे. अश्‍विनी बिद्रे 2006 साली पोलीस दलात दाखल झाल्या होत्या. त्यापूर्वीच एक वर्ष आधीच म्हणजेच 2005 साली त्यांचा विवाह हातकणंगलेमधील राजू गोरे यांच्याशी झाला होता. नोकरी लागल्यावर त्यांनी पुणे, नवी मुंबई, सांगली या भागात नोकरी बजावली. पण सांगलीत नोकरी करत असतानाच त्यांची ओळख एका पोलीस अधिकार्‍याशी झाली.