पुणे । पोलिस अधिकारी अश्विनी ब्रिदे बेपत्ता प्रकरणातील चौथा आरोपी महेश फळणीकर यास पुण्यातून अटक करण्यात आली. फळणीकर याला ताब्यात घेतल्यानंतर महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे. नवी मुंबई गुन्हे शाखेने पुण्यात येऊन ही कारवाई केली. गेल्याच आठवड्यात या प्रकरणी अभय कुरुंदकर याचा खासगी कार ड्रायव्हर कुंदन भंडारी यास पोलिसांनी अटक केली होती. या दोघांच्या आधी पोलिस निरीक्षक अभय कुरूंदकर आणि आणखी एका साथीदारास पोलिसांनी अटक केली आहे.
अश्विनी बिद्रेचा मृतदेह खाडीत फेकला
42 वर्षीय बिद्रे नवी मुंबई पोलिसांच्या मानवाधिकार विभागात कार्यरत होत्या. जवळपास गेल्या दोन वर्षा (एप्रिल 2016) पासून त्या बेपत्ता आहेत. 11 एप्रिल 2016 रोजी सायंकाळी सातच्या सुमारास बिद्रे या कुरूंदकराला पोलिस ठाण्यात भेटायला गेल्या होत्या. यानंतर अभय कुरूंदकर हे बिद्रे यांना कारमध्ये घेऊन भाईंदरच्या दिशेने रवाना झाला. याच दरम्यान कुरूंदकराने बिद्रे यांची कारमध्ये गळा दाबून किंवा गोळी झाडून हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. ही घटना 11 एप्रिल 2016 रोजी सायंकाळी 6. 41 ते रात्री 11.11 च्या दरम्यान घडली. त्यानंतर रात्री 11.18 वाजता बिद्रे यांचा मोबाईल बंद झाल्याचे दाखवत आहे. ज्या वेळेस बिद्रे यांचा मोबाईल स्वीच ऑफ झाल्याचे दाखवत आहे त्याचवेळी अभय कुरूंदकराने त्याच्या साथीदारास फोन केल्याचे दिसून आले आहे. त्यावेळी हा साथीदार भाईंदरमधील एका बारमध्ये दारू पित बसला होता व कुरूंदकराने फोन करताच तो त्यांना भेटायला गेला. यानंतर या दोघांनी रात्री अश्विनी बिद्रेचा मृतदेह कारमधून काढून खाडी फेकल्याचा संशय पोलिसांना आहे. तसेच त्यांना यावेळी त्यांचा खासगी कार चालक कुंदन भांडारी आणि महेश फळणीकर यांनी साथ दिल्याचे चौकशीत स्पष्ट
होत आहे.
लग्नाचा तगादा लावल्याने कटकट संपवली?
अभय कुरूंदकरने अश्विनी बिद्रेचे अपहरण करून हत्या केली व साथीदाराच्या मदतीने भाईंदरच्या खाडीत फेकत त्याची विल्हेवाट लावल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. ठाणे ग्रामीणचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर याचे अश्विनी बिद्रे यांच्याशी विवाहबाह्य संबंध होते. कुरूंदकर याला पत्नी व दोन मुलेही आहेत. मात्र, बिद्रे यांनी कुरुंदकर याच्या मागे लग्नाचा तगादा लावला होता. त्यावरुनच कुरुंदकर आणि बिद्रे यांच्यात रोजच भांडणे होत होती. बिद्रे यांचे पतीशी पटत नव्हते. त्यांना पहिल्या पतीपासून एक मुलगी आहे. जी आपल्या पित्याकडे राहते. कुरूंदकराने आपल्या पत्नीला घटस्फोट देऊन बिद्रे यांच्यासोबत लग्न करण्याचे वचन दिल्याची चर्चा आहे. मात्र कुरूंदकर पहिल्या पत्नीला व मुलांना सोडू शकत नव्हता तर बिद्रे यांनी लग्नाचा तगादा लावल्याने एकदाची कटकट संपवावी म्हणून त्यांची हत्या केल्याचे समोर येत आहे.