पुणे : भारताचा ऑफस्पीन गोलंदाज आर. अश्विन हा जगातील सर्वोत्तम फिरकीपडू असल्याची कबुली ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने शनिवारी येथे दिली.
आयपीएलसाठी पुण्याच्या संघाचे कर्णधारपद स्मिथकडे देण्यात आले आहे. आयपीएलसाठी हा संघ आता सज होत आहे. यानिमित्ताने येथे पत्रकार परिषदेत स्मिथ बोलत होता. ऑस्ट्रेलिया व भारतादरम्यान नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियाचा 2-1 असा पराभव केला. या मालिकेतील पुणे व बंगळुरूतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांत अश्विनने ऑस्ट्रेलियन खेळाडूंची दाणादाण उडवली होती. त्याची आठवण स्मिथने यावेळी करून दिली.
अश्विनला खेळणे हीच कसोटी
अश्विनचा टप्पा अचूक असतो. त्याच्या गोलंदाजीमागे एक निश्चित विचार असतो आणि तो फलंदाजाला नेहमी संभ्रमात पाडतो. त्यामुळे त्याची गोलंदाजी खेळणे ही खरी कसोटीच असते. या मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांत अश्विनची गोलंदाजी अधिक धारदार होती. तसेच, तो सध्या चांगल्याच फॉर्ममध्ये असून, तो जगातील सर्वोत्तम फिरकीपटू आहे, असे स्मिथ म्हणाला.
भारताचे यश वाखाणण्यासारखे
पुण्यातील कसोटी सामना आम्ही चांगल्या पद्धतीने जिंकलो. पहिल्याच कसोटीत मिळालेल्या विजयाने आमचा हुरुपही वाढला होता. परंतु, भारताने मालिकेत चांगले कम बँक केले आणि मालिका खिशात घातली. भारताचे हे यश नक्कीच वाखाणण्यासारखे आहे, असे स्मिथ म्हणाला.
फ्लेमिंगचे अभिष्टचिंतन
पुणे रायझिंग संघाचा मार्गदर्शक म्हणून न्यूझीलंडचा कर्णधार स्टीफन फ्लेमिंग काम पाहणार आहे. तो यावेळी उपस्थित होता. फ्लेमिंगचा शनिवारी वाढदिवस होता. त्यानिमित्त उपस्थितांनी केक कापून फ्लेमिंगचे अभिष्टचिंतन केले. फ्लेमिंगनेही सर्वांना धन्यवाद देत आयपीएलच्या या सिझनमध्ये पुणे संघ दमदार कामगिरी बजावेल, असा विश्वास व्यक्त केला.
कसोटी, एकदिवसीय सामना आणि टी- 20 हे क्रिकेटचे तीन वेगवेगळे प्रकार आहेत. या तिन्हीसाठी वेगळे टेंपरामेंट लागते. ते आमच्या खेळाडूंकडे आहे. या तिन्ही प्रकारांत आम्ही नक्कीच अव्वल ठरू.
स्टीव स्मिथ, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार