अष्टाणे गावाजवळ चालकाचा खून

0

साक्री । नवापूर रोडवरील अष्टाणे गावाजवळ रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या एका ट्रक चालकाचा मृतदेह आढळून आला. त्याच्या डोक्यावर गंभीर जखमाही आढळून आल्या आहेत. दोन चालकांमध्ये झालेल्या वादातून हा खून झाल्याचा अंदाज आहे. पोलिसांनी सदरचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी साक्री रुग्णालयात दाखल केला आहे. साक्री पोलिसांत या घटनेची नोंद झाली असून पुढील तपासाला सुरुवात झाली आहे. या प्रकरणी साक्री पोलिसात खूनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

30 ते 35 वर्षांच्या तरूणाचा मृतदेह
नागपूर-सुरत महामार्ग क्रमांक सहा वरील अष्टाणे गावाजवळ रस्त्याच्या बाजूला आज सकाळी एका 30 ते 35 वर्षे वयाच्या व्यक्तीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. त्याच्या डोक्यावर दगडाने किंवा लोखंडी सळईने गंभीर स्वरुपाचे वार करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. या घटनेची माहिती साक्री पोलिसांना मिळताच डीवायएसपी निलेश सोनवणे, पोलीस निरीक्षक रामदास पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी पोलिसांनी घटनास्थळाजवळील आजूबाजूचा परिसर पिंजून काढला. मृतदेहा जवळच रस्त्यावर सीजी. 04/ 8502 क्रमांकाचा ट्रक उभा असल्याने हा मृतदेह चालकाचा किंवा सहचालकाचा असण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत होती. पोलिसांनी सदरचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी साक्री रुग्णालयात दाखल केला.

चालक मध्यप्रदेशातील असल्याचे निष्पन्न
ट्रकची तपासणी केल्यानंतर पोलिसांना वाहनामध्ये वाहनाचे कागदपत्र मिळून आलेत. त्या आधारे त्यांनी ट्रक मालकाशी संपर्क साधून माहिती घेतली असता, मृत व्यक्तीचे नाव हे गोलू सिंग असून तो ट्रकवरील चालक असल्याचे निष्पन्न झाले आहे. गोलू सिंग हा मध्यप्रदेश येथील रहिवाशी आहे. गोलू सिंगचे नातेवाईक आता साक्रीला येण्यासाठी निघाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री दोन ट्रक त्या भागात उभे होते. त्यावरील चालकांनी रात्री एकत्रित स्वयंपाक करुन जेवण केले. मात्र, आज सकाळी गोलू सिंगचा मृतदेह आढळून आला. यामुळे ट्रक चालकांमध्ये काही कारणावरुन वाद झाल्यानंतर ही घटना घडली असावी, असा संशय व्यक्त होत आहे. त्या दिशेनेही साक्री पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली आहे. या कालावधीत या रस्त्यावरुन कोणते ट्रक गेले त्यांचे क्रमांक मिळविण्याचे प्रयत्न सुरु आहे. या प्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात भादंवी 302 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.