असंघटीत कामगारांच्या नोंदणीसाठी गोंदिया जिल्ह्यात विशेष मोहीम

0
तातडीने नोंदणी करण्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांचे आवाहन
नागपूर- अटल विश्वकर्मा सन्मान योजनेंतर्गत असंघटीत कामगारांचे विशेष नोंदणी अभियान दिनांक 4 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान राबवण्यात येणार असून गोंदिया जिल्ह्याताली मजूरांनी आपापली नोंदणी तातडीने करावी असे कळकळीचे आवाहन पालकमंत्री तथा सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी आज येथे केले.
या अभियानांतर्गत आतापर्यंत केवळ मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर या सहा शहरांचाच समावेश होता मात्र या विशेष अभियानांतर्गत गोंदिया जिल्ह्याचाही समावेश करावा यासाठी  राज्याचे कामगार मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांना बडोले यांनी सांकडे घातले. त्यामुळे गोंदिया जिल्ह्याचा या विशेष अभियानात समावेश करण्यात आला आहे. आजही कामगार विभागाचे प्रधान सचिव मीना तसेच कामगार आयुक्त पोयाम यांच्यासह जिल्हा कामगार अधिकाऱ्यांसोबत व्हिडीओ संवाद साधून सदर मोहिम परिणामकारक रितीने राबवावी याबाबतच्या सूचना बडोले यांनी दिल्या.
18 ते 60 वर्षे वयोगटातील व मागील वर्षभरात किमान 90 दिवस काम केलेल्या असंघटीत कामगारांनी महाराष्ट्र व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी केल्यानंतर त्यांना तब्बल 28 योजनांचा लाभ मिळणार आहे. नोंदणीकृत कामगारांच्या दोन पाल्यांना 1 ली ते 7 वी साठी प्रतिवर्ष 2500 तर 8 वी ते 10 वी साठी प्रतिवर्ष 5000 रूपये, 10 वी व 12 वी मध्ये 50 टक्के गुण मिळाल्यास 10 हजार रूपये शैक्षणिक सहाय्य, दोन पाल्यास अथवा पत्नीस पदवीच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षासाठी 20 हजार रूपये शैक्षणिक सहाय्य, दोन पाल्यास अथवा पत्नीस वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षणासाठी प्रतिवर्षी 1 लाख रूपये अशा विवध महत्वाकांक्षी योजनांचा समावेश आहे, त्यामुळे असंघटीत क्षेत्रातील कामगारांच्या कुटूंबातील व्यक्तींना मोठी संधी उपलब्ध होऊ शकते, असा विश्वास बडोले यांनी व्यक्त केला.
मंडळाकडे नोंदणीकृत कामगार महिलेस अथवा नोंदणीकृत कामगाराच्या पत्नीस दोन जिवीत अपत्यापर्यंत नैसर्गिक प्रसुतीसाठी 15000 व शस्त्रक्रियेद्वारे प्रसुतीसाठी 20 हजार रूपये आर्थिक सहाय्य, नोंदणीकृत कामगार व त्याच्या कुटूंबियांना गंभीर आजाराच्या उपचारासाठी 1 लाख रूपयांची वैद्यकीय मदत, कामगारास 75 टक्के अथवा कायमचे अपंगत्व आल्यास 2 लाख रूपयांचे आर्थिक सहाय्य, कामावर असताना मृत्यु झाल्यास त्याच्या कायदेशीर वारसास 5 लाख रूपयांचे आर्थिक सहाय्य, गृहकर्जावरील 6 लाख रूपयापर्यंतच्या व्याजाची अथवा 2 लाख रूपयांचे अनुदान, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 2 लाख रूपयांचे अनुदान, लाभार्थी मृत झाल्यास त्याच्या कायदेशीर वारसास प्रतिवर्षी 24 हजार रूपये पाच वर्षे मिळणार, लाभार्थीच्या स्वत:च्या पहिल्या विवाहाच्या खर्चाचे 30 हजार रूपयांचे अर्थ सहाय्य, कामासाठी आवश्यक अवजारे खरेदी करण्यासाठी प्रतिकुटूंब 5 हजार रूपयांचे अर्थ सहाय्य, अशा विविध योजनांचा लाभ असंघटीत कामगारांना मिळणार असल्यामुळे त्यांनी तातडीने व आपल्या कुटूंबाच्या भविष्यासाठी नोंदणी करावी, असे बडोले यांनी निक्षून सांगितले.
असंघटीत कामगारांच्या उध्दारासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून खर्च करण्यात येणारा निधी उपकरातून उपलब्ध होत आहे. आजवर महामंडळाकडे उपकराच्या माध्यमातून 6462 कोटी रूपयांचा निधी जमा झाला असून गोंदिया जिल्ह्यातील असंघटीत कामगारांसाठी निधीची अजिबात कमतरता पडणार नाही, मात्र त्यांनी मंडळाकडे आवश्यक कागदपत्रांसह 4 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यानच्या विशेष नोंदणी अभियानांतर्गत नोंदणी करणे आवश्यक आहे. विशेष नोंदणी अभियानांतर्गत एका महिन्यात गोंदिया जिल्ह्यात किमान 25 हजार असंघटीत कामगारांची नोंदणी होणे अपेक्षित असे बडोले म्हणाले.