असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी तीन महिन्यात मंडळ

0

मुंबई : असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या कल्याणासाठी एक सर्वंकष योजना तयार केली जाईल आणि त्यांच्यासाठी पडून असणाऱ्या निधीचा योग्य वापर केला जाईल तशा सूचना कामगार आयुक्तांना दिल्या जातील व दोन महिन्यात योजना तयार केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. विधानसभेत संतोष दानवे, सुरेश हळवणकर आदिंनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत हस्तक्षेप करताना ते बोलत होते. बांधकाम क्षेत्रातील तसेच मोलकरणी आदिंसाठी असणारा निधी मिळत नाही अशा तक्रारी भारती लव्हेकर, मेधा कुलकर्णी आदिंनी केल्या. त्यांना कामगार राज्यमंत्री विजय देशमुख यांनी उत्तर देताना सांगितले की शेतमजूर,यंत्रमाग कामगारांसाठी तसेच सर्वच क्षेत्रातील असंघटित कामगारांसाठी तीन महिन्यात मंडळ केले जाईल. विकासकांच्याकडे काम करणाऱ्या कामगारांचे अडीच कोटी रुपये मंडळाकडे जमा असल्याचेही राज्यमंत्री म्हणाले.

राज्यात असंगठीत कामगारांची 122 उद्योगांची यादी असून जवळपास 399 कोटी असंगठीत कामगार काम करत असल्याची माहिती ना. देशमुख यांनी यावेळी दिली. यावेळी पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेते यांनाही या मंडळाचा लाभ मिळेल असेही त्यांनी उत्तरात सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, असंगठीत कामगारांसाठी व्यवस्थित प्लान असून त्यांच्यासाठी असलेल्या पैशाचे योग्य नियोजन करून सर्वंकष धोरण राबविले जाईल.