असंपदेचे 50 लाख कुणाचे? कोठून आणले अन् खर्च झाले कुठे? हे गुलदस्त्यात

0

ग.स.बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी दोन्ही संशयितांना पाच दिवसांची पोलीस कोठडी ; संचालकांसह इतर कर्मचारीही संशयाच्या भोवर्‍यात

जळगाव : जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीत विभागीय अधिकारी किरण पाटील यांच्या नावाने बनावट खाते उघडून बेहीशोबी 50 लाख रूपये अष्टचक्र ठेवीत ठेवले. नंतर सदर रक्कम चेकवर बनावट स्वाक्षरी करून तत्कालीन चेअरमन सुनील सुर्यवंशी यांनी व्याजासकट काढुन फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. यात लाचलुचपत विभागाच्या पथकाने या सुर्यवंशी तसेच पाटील या दोघांना बुधवारी अटक केली होती. गुरूवारी दोघांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान संशयीतानी 50 लाख रूपये कुणाचे, कोठून आणले, व चेक व रोखीने व्याजासह प्राप्त केलेली रक्कमेची कुठे व कोणत्या प्रकारे विल्हेवाट लावली? ह्या प्रश्‍नांची उत्तरे अद्यापही गुलदस्त्यात असून एसीबीच्या तपासात तसेच चौकशीत नेमके सत्य समोर येणार आहे.

संशयितांच्या वकिलांचा युक्तीवाद असा
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणी बुधवारी एसीबीचे उपअधीक्षक गोपाळ ठाकुर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. न्या. डी.ए. देशपांडे यांच्या न्यायालयात सुनिल सुर्यवंशी यांच्यावतीने युक्तीवाद करताना अ‍ॅड. सागर चित्रे यांनी सांगीतले, राजकीय व्देषाने सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी यापूर्वी झाली आहे. आम्ही 2017 मध्ये संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पोलीस कोठडीची आवश्यकता नाही. किरण पाटील यांच्यातर्फे अ‍ॅड. प्रकाश पाटील यांनी युक्तीवादात सांगीतले, खाते उघडताना दाखविलेली स्वाक्षरी किरण पाटील यांची नाही. यापूर्वीच्या चौकशीत आम्ही सविस्तर जबाब दिला आहे. घेण्यात आलेल्या चौकशीमध्ये सोसायटीतील कर्मचार्‍यांनी सदरचा गैरव्यवहार सुनील सुर्यवंशी यांनी केल्याचे सांगीतले आहे. त्यामुळे या गुन्हयात किरण पाटील यांचा संबंध नसल्याने पोलीस कोठडी नाकारण्यात यावी,अशी विनंती केली.

गुन्ह्यात संचालकासह कर्मचार्‍यांच्या सहभागाची शक्यता?
ग.स. संस्थेमध्ये एकुण 38 कार्यकारी संचालक, संस्थेच्या 52 शाखा, 40 हजार सभासद व संस्थेचे 01 हजार कोटी खेळते भांडवल अशा प्रकारे संस्थेची मोठी व्याप्ती आहे. तपास क्लिष्ट स्वरूपाचा असुन या गुन्ह्यातील संशयितांनी 12 फेब्रुवारी 2016 रोजी संस्थेत जमा केलेले 50 लाख रूपये कोठुन उपलब्ध केले तसेच गुन्हयात संशयीतांनी दि. 19 सप्टेंबर 16 रोजी प्रथम चेक व रोखीने व्याजासह प्राप्त केलेली रू. 51,78,887 रक्कमेची कोणत्या प्रकारे विल्हेवाट लावली याबाबतची सखोल चौकशी करणे गरजेचे असून या प्रकरणात इतर कार्यकारी मंडळाचे संचालक अथवा सदर संस्थेतील अधिकारी , कर्मचारी यांचा सहभाग असण्याची दाट शक्यता युक्तीवाद करतांना तपासधिकारी गोपाळ ठाकूर यांनी व्यक्त केली व पोलीस कोठडीची मागणी केली. तसेच संशयीतांनी बॅँक अकाउंन्ट, पोस्ट ऑफीस, पतपेढीमधील खात्यांमध्ये व इतर योजनांमध्ये गुंतवणुक केली असण्याची दाट शक्यता असल्याचेही त्यांनी म्हटले आहे

दोघांना 24 जून पर्यंत पोलीस कोठडी
सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकिल अ‍ॅड. केतन ढाके यांनी युक्तीवादात 10 जून 19 च्या आदेशानुसार सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयीतांना गुन्हे कामी फसवणुक केली आहे.50 लाख रूपयांची रक्कम असल्यामुळे सखोल तपास होणे गरजेचे आहे. या व्यवहारांमध्ये असलेले हस्ताक्षर कोणाचे आहे हा तपास करणे आवश्यक आहे. त्यासाठी संशयीताना पोलीस कोठडीची गरज असल्याचे सांगितले. संशयितांचे वकील, सरकारपक्ष व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी या सर्वांच्या युक्तीवादानुसार न्या. डी.ए. देशपांडे यांनी संशयितांना 24 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.