आपल्या महाराष्ट्राला इतिहास आहे बोगस आणि वादग्रस्त बोलणाऱ्यांचा. मग ते बेताल नेते असो अथवा बोगस व्याख्याते. ह्यांना मोठं करणारे खरे दोषी. ते दोषी म्हणजे समोर बसलेली गर्दी. ही गर्दीच असंवेदनशील आहे. टाळ्या, शिट्ट्या आणि ओरडून मिळविलेल्या बोगस आत्मविश्वासाच्या जोरावर पिढ्या बरबाद झाल्या आणि होताहेत. यासाठी गर्दी समृद्ध होणे आवश्यक. मागे मी एका महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्यात्याबद्दल लिहिलं होतं. त्या व्याख्यात्याकडून महापुरुषांचा इतिहास सांगताना केला जाणारा विक्षिप्त हावभाव आणि अभिनय पाहून चेकाळणारी गर्दी आणि महापुरुषांना डोक्यात घेण्यापेक्षा डोक्यावर घेण्याचे वाढते प्रमाण अशा लोकांना ‘ओळख आणि वलय’ देण्यासाठी सर्वाधिक दोषी आहे. वक्तृत्व कौशल्याचा अभाव असल्याने सभांमध्ये बोलताना आपल्या मनात येईल त्या पद्धतीने जिभेचे लोळ तोडण्याचे प्रकार आज प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. सामान्यांचा माणूस, सामान्यांचे नेतृत्व आहे असे भासवून हे लोकं नेता अर्थात पुढारी बनून नंतर सामान्य लोकांवरच बोगस जोक मारत राजकीय पोळी भाजत राहतात. हे सर्व घडत असताना ही गर्दी अवतीभवतीच असते. गर्दीच्या आवेशाच्या बळावरच नेत्यांना काय बोलावे? याची जाणीव राहिलेली नाही.
पंढरपूरमधून सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाची समीकरणे बांधणाऱ्या सुधाकरपंत पारिचारकांच्या वारसदाराची वैचारिक बैठक फारच बोगस निघाल्याचे प्रशांत पारिचारकांच्या परवाच्या वादग्रस्त वक्तव्यावरून स्पष्ट झाले. सबंध महाराष्ट्र आणि देशातील नेत्यांप्रमाणेच सोलापूर जिल्ह्यालाही वादग्रस्त विधाने करणाऱ्या नेत्यांचा चांगलाच इतिहास आहे. या श्रेणीत अगदी माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यापासून ते राज्याचे जलसंपदा मंत्री राहिलेले बार्शीचेआ. दिलीप सोपल यांच्यापर्यंत अनेक नावे आहेत. शिंदे यांनी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून चालविण्यात येणारे कॅम्प हे हिंदू दहशतवाद्यांसाठीच असल्याचे, वादग्रस्त वक्तव्य करून वाद ओढवून घेतला होता. त्याचबरोबर मिडीयावर हल्लाबोल करताना नागरिकांमध्ये चुकीचा संदेश पोचवत असलेल्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांना चिरडून टाका, असेही शिंदे म्हटले होते. शिंदे यांच्यासोबतच जिल्ह्यातील महत्वाचे नेते मानले जाणारे माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांना स्त्रियांबाबत अपमानास्पद बोलल्यामुळे नागपूरच्या आण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनात लोकं अंगावर आल्याने अक्षरशा संमेलनातून पळून जाण्याची नौबत आली होती. शिंदे, ढोबळे यांच्यासारख्या हुशार नेत्यांकडून खरतर अशी विधाने येणे आश्चर्याची गोष्ट म्हणावी लागेल. लोकांचे नेते असलेले हे लोकं अशी विधाने लोकांसमोर करत असतात.
हे सोलापूर जिल्ह्यापुरते मर्यादित नाहीत. तर महाराष्ट्रात आणि भारतात याचे प्रमाण वाढते आहे. महाराष्ट्राचे सांगायचे झाले तर विलासराव देशमुख, शरद पवार, अजित पवार, नारायण राणे, एकनाथराव खडसे, अशोक चव्हाण यांच्यासारखे अनेक महत्वाचे नेते आहेत ज्यांचा जिभेवरचा ताबा सुटला आहे आणि त्यानंतर त्यांनी ‘माझ्या बोलण्याचा विपर्यास केला आहे, जर यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो’ असे म्हणून आत्मक्लेश देखील केला आहे. आपण लोकप्रतिनिधी आहोत याचा अर्थ आपल्या बुद्धीवर, चारित्र्यावर लोकांनी विश्वास ठेवला आहे असा होतो. पण, अशी वादग्रस्त विधाने करून हा मिळविलेला विश्वास धुळीला मिळवला जातो. बोलण्याची क्षमता असली तरी त्याचा वापर वादग्रस्त विधाने करण्यासाठीच केला पाहिजे, असा नियम नाही. घर असो वा इतर ठिकाण, तेथे बाष्कळ, निरर्थक बडबड करणारी माणसे इतरांना नकोशी होतात. अशी विधाने करणाऱ्या राजकीय नेत्यांबाबतही आता तसेच होत आहे. लोकप्रतिनिधी बनल्यावर त्याच्यावर लोकांचे विविध प्रश्न सोडवण्याच्या जबाबदाऱ्या येतात. पण, त्या पार न पाडता अशी वादग्रस्त विधाने करून नवीनच प्रश्न निर्माण करण्याचे काम हे राजकीय नेते आजकाल करू लागले आहेत. त्यामुळे अशी विधाने करणाऱ्या नेत्यांवर कडक निर्बंध आणणे गरजेचे आहे.
नेते, मंत्री किंवा लोकप्रतिनिधी भावनेच्या भरात म्हणा किंवा बोलायला येत नसल्याने मीडियासमोर किंवा लोकांसमोर काय-बाय बरळून जातात. अनेकदा लोकांना माहिती नसलेले नेतेदेखील अशा वक्तव्यांनी लोकांना माहिती पडून जातात. प्रसिद्धीला हाताशी काही नसले की, काहीबाही बरळून प्रसिद्धीला येण्याचा हा निश्चितच नवा फॉर्म्युला नाही. माध्यमांमधून अशा लोकांनी तोडलेल्या अकलेच्या ताऱ्यांची गोष्ट लोकांपर्यंत पोहोचते आणि मग त्यांच्या बोलण्याचा मतितार्थ समजल्यावर सुरु होतो त्यांचा निषेध. आणि हा निषेध करताना मग निषेध करणारे लोकही पातळी सोडतात. यात मग त्या नेत्यांच्या आई, बहिणींना, मुलींना ओढून-ताणून आणून त्यावर अश्लील शेरेबाजी केली जाते. आजकाल तर सोशल माध्यमांवर खुला मंच असल्याने याचे प्रमाण अधिक वाढले आहे. मात्र अशाने त्या नेत्याला शिक्षा मिळते का? किंवा त्याच्या अशा बोलण्यात किंवा वागण्यात त्याच्या परिवाराचा कितपत संबंध असतो? या प्रश्नावर टीका करणाऱ्यांनी विचार करायला हवा.
अशा नेत्यांवर बंधने यायला हवीतच. मात्र अशा नेत्यांना ऐकून जोश के साथ टाळ्या, शिट्ट्या वाजविणाऱ्या गर्दीचं काय करायचं? म्हणजे पारिचारकांच्या व्हिडियोमध्ये स्पष्ट दिसतेय की पारिचारक त्यांच्या अनैतिक बुद्धीतून जवानांच्या संदर्भात वादग्रस्त विधान करताहेत आणि समोर बसलेली असंवेदनशील गर्दी त्यावर टाळ्या आणि शिट्ट्या वाजवतेय. ही टाळ्या आणि शिट्ट्या वाजविणारी विकृत गर्दी मला त्या पारिचारक यांच्या विधानापेक्षा भयानक वाटतेय. अशी बेताल वक्तव्ये करण्याला जोर देणारी ही असंबद्ध गर्दीच बोगस राजकीय नेतृत्वासाठी जबाबदार आहे. ही गर्दी ‘दर्दी’ व्हायला हवी. गर्दीला ‘समज’ असणे आजच्या राजकीय वातावरणासाठी अत्यंत महत्वाचे झाले आहे. जर संवेदनशील आणि समज असणारी गर्दी तयार झाली तर अशा जनमताच्या बळावर लोकप्रतिनिधी झालेल्या नेत्यांची हिंमतच होणार नाही बेताल वक्तव्ये करण्याची!