मुंबई: मुख्यमंत्री पदावरून सेना, भाजपामध्ये तू,तू, मै, मै सामना रंगला असतांना सेनेने जागावाटप करतांना समसमान पदे देण्याचे ठरले होते असे सांगण्यात आले होते. मुख्यमंत्री पदावरून सेना, भाजपा मध्ये वाद वाढत जाऊन दोघ पक्षांनी एकमेकां विरोधात आरोप, प्रत्यारोप केले होते. या बाबत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी जागावाटप करतांना काही ठरले नव्हते असे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. यावर सेनेने बाळासाहेबांची शपथ घेत आम्ही खोटे बोलत नसल्याचा दावा केला होता. भाजपचे आमदार आशीष शेलार यांनी युतीतील सत्तावाटपाच्या चर्चेबाबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी जे सांगितले , तेच सत्य आहे. त्यामुळे कुणाची अडचण होत असेल आणि राजकीय स्वार्थापोटी कुणी असत्य पसरवत असेल तर त्याला आमचा नाइलाज आहे,’ अशा शब्दांत आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे.
महायुतीच्या सरकारमध्ये समसमान सत्तावाटप करण्याचा निर्णय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व अमित शहा यांच्यात झाला होता. मात्र, शहा यांनी हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवलाच नाही. त्यामुळंच सध्याचा गोंधळ निर्माण झाला,’ असा आरोप शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला होता. भाजपने आज त्यांच्या या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. पंतप्रधान मोदी यांना अमित शहांनी अंधारात ठेवल्याचा राऊत यांचा आरोप शेलार यांनी खोडून काढला. ‘मोदी आणि शहा यांना समजून घेण्यासाठी राऊत यांना अनेक जन्म घ्यावे लागतील असे म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल आम्हाला आदर व प्रेम असल्याचं राऊत यांनी काल म्हटलं होतं. त्यावरही शेलार यांनी टोला लगावला. शिवसेनेचं मोदींबद्दलचं प्रेम स्वार्थी की नि:स्वार्थी हे पाहावं लागेल, असं ते म्हणाले. ‘पूर्वी इतर पक्षाचे लोक ‘मातोश्री’वर राजकीय चर्चा करण्यासाठी व निर्णय घेण्यासाठी यायचे. आता सत्तेच्या लालसेपोटी ‘मातोश्री’च्या बाहेर पडून फाइव्ह स्टार हॉटेलच्या वाऱ्या सुरू आहेत. ‘मातोश्री’तून बाहेर पडून आपल्याच कुटुंबातील राज ठाकरे यांना न भेटणारे आता माणिकराव ठाकरेंना भेटण्यासाठी हॉटेलात जात आहेत,’ असा चिमटाही शेलार यांनी काढला.