कोलकता । तृणमूल काँग्रेसच्या आमदार मोहुआ मोईत्रा यांच्याबद्दल अपमानजनक शब्दांचा वापर केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो यांच्याविरोधात आज चार्जशीट दाखल करण्यात आले आहे. तृणमूलच्या आमदार मोहुआ मोईत्रा यांनी 4 जानेवारी रोजी बाबूल सुप्रियो यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या एका मुलाखती दरम्यान बाबूल सुप्रियो यांनी मोहुआ यांच्याबद्दल अपमानजनक शब्द काढले होते. त्यामुळे आपल्या प्रतिमेला धक्का पोहचला असे मोईत्रा यांनी म्हटले. त्यांच्या तक्रारीच्या आधारावर कारवाई करण्यात आली. बाबूल सुप्रियो यांच्याविरोधात अलीपोर कोर्टात चार्जशीट दाखल करण्यात आले आहे. तीन जानेवारी रोजी झालेल्या एका कार्यक्रमामध्ये बाबूल सुप्रियो यांनी मोहुआ यांच्या नावाचे साधर्म्य महुआ या स्थानिक मद्यासोबत आहे असे म्हटले होते. पोलिसांनी टी. व्ही. कार्यक्रमाचे फुटेज न्यायालयात जमा केले आहे. हा कार्यक्रम 3 जानेवारी रोजी प्रसारित झाला होता.