महापालिकेचे होते दुर्लक्ष
पिंपरीः पिंपरी-चिंचवड शहरामध्ये अनेक ठिकाणी चेंबर्स रस्त्याला समांतर नसल्याने रस्त्यांमध्ये खड्डे निर्माण झाले आहेत. मुख्य रस्ता आणि अंतर्गत रस्त्यावरील चेंबर्सजवळ खड्डे दिसून येत आहेत. या खड्डयात वाहने आदळून मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. त्यामुळे शहरातील अनेक रस्ते नव्याने बांधताना चेंबरची झाकणे रस्त्याच्या समान पातळीत असणे गरजेचे आहे. मात्र, महापालिकेकडून या गंभीर परिस्थितीकडे दुर्लक्ष होते आहे. महापालिकेच्या स्थापत्य विभागाला धोकादायक चेंबरचे गांभीर्य नसल्याची तक्रार नागरिक करत आहेत.
सिमेंटची झाकण
पावसाळ्यापूर्वी नादुरुस्त चेंबरचे सर्व्हेक्षण करुन महापालिकेने ते दुरुस्त करणे आवश्यक होते. परंतु, महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे चेंबरच्या समस्या निर्माण होऊन कित्येक नागरिकांचा जीव जात आहे. काही दिवसांपूर्वी महापालिकेने लोखंडी जाळ्या काढून रस्त्याला समांतर सिमेंटच्या पक्क्या बांधकामात चेंबरची झाकणे बसविण्याचे काम सुरु होते. परंतु, नंतर ते थांबविण्यात आले. युवा सेनेच्या वतीने मागील आठवड्यात चिखलीमध्ये चेंबरमध्ये वृक्षारोपण करत या समस्येकडे लक्ष वेधले होते. मात्र, त्यानंतरही महापालिका प्रशासन जागे झाले नसल्याचे चित्र आहे. चेंबरवरील लोखंडी जाळ्या धोकादायक असल्याने चेंबरला सिमेंटची झाकणे बसविणे आवश्यक आहे. याकडे, प्रशासनाने तत्काळ लक्ष देवून नागरी समस्या सोडवाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.