पुणे । पर्वती जलशुद्धीकरण केंद्राच्या कामासाठी निधी नाकारणार्या राज्य सरकारचे प्रतिनिधी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी या प्रकल्पाचे उद्घाटन करणे हा पुणेकरांचा अपमान आहे. कामासाठी निधी न देता उलट पुणेकरच जास्त पाणी वापरत असल्याची टीका करण्यात महाजन यांनी धन्यता मानली आहे. त्यामुळे असे पाहुणे बोलविताना विचार करावा, अशी विनंती काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी महापौर मुक्ता टिळक यांच्याकडे केली आहे.
अरविंद शिंदे यांचे महापौरांना पत्र
पालिकेने पर्वती जलकेंद्रात उभारलेल्या 500 एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन जलसंपदामंत्री महाजन यांच्या हस्ते झाले. यानिमित्ताने काँग्रेसचे गटनेते शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड या वेळी उपस्थित होते. केंद्रात आघाडीचे सरकार असताना जेएनएनयूआरएम योजनेअंतर्गत पर्वती जलशुद्धीकरण केंद्राच्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली होती. या प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून 100 कोटी रुपयांहून अधिक निधी महापालिकेला मिळणार होता. परंतु केंद्रात आणि राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर सत्तेत आलेल्या भाजपने जेएनएनयूआरएम योजना बंद केली. इतकेच नव्हे; तर पर्वती प्रकल्पाला निधी देणार नसल्याचे पालिकेला कळविले. त्यामुळे पालिकेने स्वत: हा खर्च करून प्रकल्प उभारला आहे. प्रकल्पासाठी निधी न देणार्यांनीच या प्रकल्पांचे उद्घाटन करताना पाणी वापरावरून नागरिकांवर टीका करणे हा पुणेकरांचा अपमान आहे, असा आरोप शिंदे यांनी केला. यापुढील काळात अशा पाहुण्यांना बोलविताना विचार करावा, असे पत्र शिंदे यांनी महापौर टिळक यांना दिले आहे.