मुंबई – मुंबई तसेच इतर महापालिकांच्या स्वायत्तता जपण्यासाठी जी.एस.टी.ला विरोध करणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी असा कोणता मसुदा दाखवला की पाच मिनिटांतच त्यांचे समाधान झाले, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी शनिवारी विधान परिषदेत केला.
सुनील तटकरे यांनी राज्यात जी.एस.टी.च्या अंमलबजावणीसाठी मांडण्यात आलेल्या विधेयकावरच्या चर्चेत शिवसेनेच्या सत्तेत राहूनही विरोधकाची भूमिका वठविण्याच्या धोरणावर टीका केली. संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनीच विधेयकाचा इंग्रजी मसुदा मराठीत वेळेत भाषांतर होऊ शकला नाही म्हणून दोन दिवस आधी सदस्यांना देता आला नाही, हे मान्य केले आहे. मग, मुनगंटीवार यांनी शिवसेनेचा विरोध मोडून काढताना मनेमके काय केले, असा सवाल त्यांनी केला. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मातोश्रीवर जाण्यास आमची हरकत नाही. त्यांनी पायावर डोके ठेवावे की डोक्यावर पाय ठेवावे हा त्यांचा प्रश्न आहे. पण, सरकारला वारंवार विरोध करणाऱ्या शिवसेनेचे आणि भाजपाचे नेमके काय चालले आहे, हा खरा प्रश्न आहे, असे ते म्हणाले.
नाशिकच्या गुहेत वाघाने डरकाळी मारली. कर्जमुक्तीशिवाय जी.एस.टी.चे विधेयक मांडू देणार नाही, म्हणाले. आम्ही १५ वर्षे सत्तेत होतो. मंत्रिमंडळाच्या बैठकीत येणाऱ्या विषयाची टिप्पणी आदल्या दिवशी मंत्र्यांना दिली जाते, हे सर्वांना माहित आहे. मुद्रांक शुल्क वाढीच्या बाबतीतही तसेच झाले. पण, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गाढे अभ्यासक रामदास कदम यांना हे समजलेच नाही. बैठकीच्या दुसऱ्या दिवशी ही वाढ मागे घ्या, अशी मागणी त्यांनी केली. रस्त्यावर येण्याची भाषा केली. भारतीय जनता पार्टीवर त्यांना सोडून दिले आहे. मातोश्रीत तडजोडीच्या, समेटाच्या बैठकीसाठी मात्र, त्यांना बोलावले जात नाही. मिठाचा खडा टाकू नये, म्हणून रामदासभाईंना कधी व कोणत्या बैठकीला बोलवायचे हे ठरवले जाते, असेही तटकरे म्हणाले.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीवर आक्रमक झालेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी खास विमानाने दिल्लीला नेले. केंद्रीय वित्तमंत्री अरूण जेटली यांच्यापुढे बसवले. १५ मिनिटांपैकी चार-पाच मिनिटे खुशाली विचारण्यातच गेली. बाहेर आल्यावर सकारात्मक चर्चा झाल्याचे शिवसेनेच्या मंत्र्यांनी प्रसिद्धीमाध्यमांना सांगितले. मुख्यमंत्र्यांबरोबर खास विमानाने दिल्लीला जायला मिळाले यातच हे खूष. हे महत्भाग्य आपल्याला मिळाले यातच हे समाधानी झाले व कर्जमुक्तीचा विषय संपला, अशी खिल्लीही तटकरे यांनी उडवली.