असिफाच्या न्यायासाठी बारामतीत हजारोंचा मूक मोर्चा

0

बारामती । बारामतीत हजारो नागरीकांनी रस्त्यावर उतरून कठूआ, उन्नाव आणि अन्य ठिकाणच्या पीडितांना न्याय देण्याची मागणी केली. या घटनांमधील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी आणि पुन्हा असे प्रकार घडणार नाहीत यासाठी शासनानं कठोर पाउले उचलण्याची आग्रही मागणी या मूक मोर्चाद्वारे करण्यात आली. विशेष म्हणजे, शहरातील व्यापार्‍यांनी आपली दुकाने दुपारपर्यंत बंद ठेवत मूकमोर्चाला पाठींबा देवून या घटनांचा निषेध व्यक्त केला.

बारामती शहरात आज जम्मू काश्मीरमधील कठूआ येथील आठ वर्षीय आसिफा, उत्तरप्रदेशमधील उन्नाव आणि सुरत येथील बलात्कार व खून प्रकरणातील आरोपीना फाशीची शिक्षा देऊन त्यांना न्याय द्यावा या मागणीसाठी नागरिक व विविध संघटनासह अखंड भारत जनजागृती मोर्चाच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला. शहरातील मुजावरवाडा येथून सुरु झालेला हा मोर्चा कसबा, गुणवडी चौक, गांधी चौक येथून भिगवण चौकात नेण्यात आला. या मोर्चामध्ये बारामती शहरातील नागरिकांसह विविध संघटना, वकील, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. बारामती नगरपरिषदेसमोर मोर्चाची सांगता करण्यात आली.

यावेळी मोर्चात सहभागी झालेल्या चिमुकल्या मुलीने कविता सादर करत पिडीत मुलींची व्यथा मांडली. तर अनेक मुलीनी आपल्या भावनांना वाट करून दिली. काश्मीरमधील अत्याचार पीडितांना न्याय मिळत नसल्याची खंत व्यक्त करतानाच संबंधित गुन्हेगाराच्या समर्थनार्थ मोर्चा काढणे ही देशातील तमाम मुलींच्या मातापित्यांचा आणि संविधानाचा अपमान असल्याची भावना अलिशा नसीर बागवान या विद्यार्थीनीने व्यक्त केली.

आरोपींच्या समर्थकांवर देशद्रोहाचे खटले भरा
संबंधित आरोपींना कठोर शिक्षा द्यावी, आसीफाच्या कुटुंबियांना संरक्षण द्यावं, उन्नाव आणि सुरत येथील घटनांमधील आरोपींवर तातडीने कारवाई करावी, हे सर्व खटले जलदगती न्यायालयात दाखल करावेत,आरोपींच्या समर्थनार्थ मोर्चे काढणारांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत आणि या घटनांमधील सर्वच आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, आसिफा प्रकरणात पुरावे नष्ट करणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांना सेवेतून बडतर्फ करावे, या खटल्यातील सरकारी वकील दीपिकासिंह राजावत यांना पोलीस संरक्षण द्यावे, पक्षपाती वकिलांची सनद रद्द करावी, बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायद्याची व्याप्ती वाढवावी अशा विविध मागण्या या मूक मोर्चाद्वारे करण्यात आल्या. मागण्यांचे निवेदन खुदैजा सिकंदर शेख या विद्यार्थीनीने वाचून दाखवले. प्रांताधिकारी हेमंत निकम यांना या मागण्यांचे निवेदन विविध जाती धर्मातील चिमुकल्या मुलींच्या हस्ते देण्यात आले. राष्ट्रगीताने या मोर्चाची सांगता करण्यात आली. विशेष म्हणजे मोर्चाच्या संयोजकांकडून कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी स्वयंसेवकांची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे पोलीस यंत्रणेला या मोर्चावेळी कोणताही ताण आला नाही.