असुरक्षित शाळा!

0

गुरूग्राममधील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रद्युम्न ठाकूर या सात वर्षांच्या बालकाचा खून झाला होता. सकाळी त्याचे बाबा त्याला व त्याच्या मोठ्या बहिणीला शाळेत सोडून गेले. शाळेत शिरल्यानंतर त्याची बहीण वर्गात गेली, तर प्रद्युम्न त्याच्या वर्गापासून अगदी जवळच असलेल्या स्वच्छतागृहात गेला. यानंतर काही मिनिटांतच तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. रुग्णालयात दाखल करेपर्यंत निष्पाप प्रद्युम्नने या जगाचा निरोप घेतला होता. या कोवळ्या जीवाच्या मानेवर इतक्या निर्दयीपणे वार करण्यात आला होते की, ते पाहून शवपरीक्षण करणारे डॉक्टरसुद्धा चक्रावून गेले होते. एका गोड, निरागस जीवाला एवढ्या निर्दयीपणे मारणारा किती विकृत असेल हे यावरूनच स्पष्ट होते. हे झाले बालकांवर अत्याचार करणार्‍या नराधमांविषयी. पण शाळांचे काय? शाळा आपली जबाबदारी किती पार पाडतात? जेव्हा प्रद्युम्नचा खून झाला तेव्हा शाळेतीलच जबाबदार व्यक्तींनी तेथे पडलेले रक्ताचे डाग पुसण्याचा दुसरा गुन्हा पार पाडला. म्हणजेच ही शाळा आणि तिचे चालकसुद्धा त्या नराधमाएवढेच क्रूर आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

स्कूल बसच्या एका वाहकाने हे मन विषन्न करणारे आणि माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य केले आहे. या घटनेनंतर पालकांनी संताप व्यक्त करत जे आंदोलन केले. त्यामुळे प्रशासनाला दखल घेत शाळा प्रशासन आणि गुन्हेगारावर तातडीने कारवाई करावी लागली. या शाळेचे संचालक हे बडी असामी आहेत. मोठमोठ्या राजकीय नेत्यांसोबत त्यांची ऊठबस आहे. देशभरात त्यांच्या सुमारे अडीचशे शाळा आहेत. त्यामुळे एक प्रद्युम्न गेला तरी त्यांना काहीच फरक पडत नाही. त्यांना काळजी आहे ती त्यांच्या शाळांच्या खोट्या प्रतिष्ठेची. अटकेपासून वाचण्यासाठी रेयान ऑगस्टीन पिंटो, रेयान ऑगस्टीन फ्रांसिस पिंटो आणि ग्रेस पिंटो हे संचालक वाटेल ते प्रयत्न सध्या करत आहेत. या प्रकरणाची आणखी एक काळीबाजू पुढे येऊ पाहत आहे, ती म्हणजे मृत प्रद्युम्नवर अत्याचार करणारा गुन्हेगार आता म्हणत आहे की, शाळा प्रशासनाने या गुन्ह्यात मला अडकवले आहे. पंचवीस लाख रुपये देण्याचे आमिष शाळेने दाखवले म्हणून मी गुन्हा कबूल केला. हा गुन्हेगार काही म्हणत असला, तरी पोलीस तपासात खरी बाजू पुढे येईलच. परंतु, या प्रकरणात शाळा प्रशासन क्रमांक दोनचे गुन्हेगार आहे हे स्पष्ट होते.

विद्यार्थ्याच्या खुनाचे पुरावे नष्ट करणार्‍या अशा शाळेच्या संचालकांना फासावरच लटकवले पाहिजे. त्याशिवाय अन्य शाळा धडा घेणार नाहीत. निरागस बालकाचा जीव गेला असताना शाळेच्या भवितव्याची चिंता करणार्‍या या राक्षसी प्रवृत्तीच्या संचालकांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे. त्यांना बालकांच्या जीवापेक्षा शाळेचे भविष्य आणि शिक्षणाच्या धंद्यातून मिळणारा बक्कळ पैसा अधिक महत्त्वाचा वाटतो, अशा नराधमांना न्यायालयानेही दया दाखवता कामा नये. त्यांच्या सर्व शाळांवर सरकारने निर्बंध आणले पाहिजेत. जेणेकरून पुन्हा अशी घटना घडणार नाही. गुरूग्राममधील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये हा प्रकार घडला. परंतु, देशातील अन्य शाळातरी सुरक्षित आहेत का? प्रद्युम्नची हत्या झाल्याने हे प्रकरण खूपच तापले. घर ते शाळा यादरम्यान बालकांचे लैंगिक शोषण होण्याच्या शेकडो घटना सातत्याने घडत आहेत, त्यास महाराष्ट्रही अपवाद नाही. पुणे, मुंबईसारख्या शहरात माणुसकीला काळिमा फासणार्‍या या घटना सतत घडत आहेत. छोट्या मुलांना शाळेत सोडल्यानंतर किंवा शाळेत जाण्यासाठी व्हॅनमध्ये बसवल्यानंतर पालक निश्िंचत असतात. पण, याच मार्गावर अनेक श्‍वापदं माणसाचा मुखवटा घालून या निरागस जीवांचा घास घेण्यासाठी टपलेली असतात. जेव्हा घटना घडते तेव्हा पालकांना जाग येते. ते तरी काय करणार? त्यांना तरी मुखवटा घातलेली ही श्‍वापदं कशी ओळखता येणार? आपल्या काळजाच्या तुकड्याला शाळा आणि व्हॅनचालकांच्या भरवशावर त्यांना सोडावेच लागते. गुरूग्राममधील घटनेनंतर तरी शाळांनी मुलांच्या सुरक्षिततेसाठी पावले उचलली पाहिजेत. बालकांच्या सुरक्षेसाठी शासनाने शाळा, स्कूल व्हॅनसाठी कठोर नियमावली करणे गरजेचे आहे.

सीसीटीव्ही यंत्रणा सर्वच शाळा, स्कूल व्हॅनमध्ये बंधनकारक केली पाहिजे. गुरूग्राममधील घटनेला काही तास उलटत नाहीत तोच दिल्लीतील टागोर पब्लिक स्कूलमध्येही आणखी एका मुलाची अशाप्रकारे हत्या झाल्यानंतर सीबीएससी बोर्डाला जाग आली आणि त्यांनी काही मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावणे अत्यावश्यक आहे तसेच कर्मचार्‍यांचे पोलीस व्हेरिफिकेशन करून घ्यावे, शाळेत बाहेरून येणार्‍या लोकांच्या प्रवेशाला आळा घातला पाहिजे, असे या आदेशात म्हटले आहे. सद्यःस्थितीत शाळांमध्ये मुलांबाबत घडणार्‍या घटना पाहता, शाळा आता मुलांसाठी सुरक्षित राहिल्या नाहीत, अशी खंत नोबेल पुरस्कार विजेते सामाजिक कार्यकर्ते कैलाश सत्यार्थी यांनी व्यक्त केली होती. सत्यार्थींची ही खंत निश्‍चित प्रत्येकाच्या काळजाला पीळ पाडणारी आहे. सध्या समोर येणार्‍या घटनांमुळे शिक्षणाबाबत आणि शिक्षण देणार्‍या संस्थांबाबत पालकांच्या मनात घृणा निर्माण झाली असून, ही बाब देशासाठी खरोखरंच शरमेची म्हणावी लागेल. मात्र, अजूनही महाराष्ट्राच्या शिक्षण खात्याला जाग आलेली नाही. आपले शिक्षण खाते वंदे मातरम् आणि जयहिंद म्हणण्याची सक्ती करण्यातच अजूनही दंग दिसते.