अस्तित्वाच्या खुणा कायमस्वरुपी राहतील असे काम करा : सुबोध भावे

0

पुणे । जीवनात सर्वच क्षेत्रात अस्तित्वाची लढाई असते. अस्तित्व झाडासारखे असते. कितीही उंच वाढले, तरी जमिनीशी नाते तोडत नाही. बिजातून नवनिर्मिती करते. कलाकार म्हणून आयुष्य संकोचित नसावे ते कायमस्वरुपी असावे. तोडफोडीसाठी कल्पकता लागत नाही, मात्र जोडणे अवघड असते. सकारात्मक विचार करा. कलाकार, मूर्तिकार, गायक किंवा माणूस म्हणून तुम्ही जे काम करता ते इथेच ठेवून जावे लागते. तुम्ही केलेल्या कामाच्या आनंददायी खुणा म्हणजेच तुमचे अस्तित्व असते. म्हणून अस्तित्वाच्या खुणा राहतील असे काम करा, असे आवाहन सुप्रसिध्द अभिनेता दिग्दर्शक सुबोध भावे यांनी नुकताच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना केले.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात (बीएमसीसी) ‘अस्तित्व 2017’ या सांस्कृतिक उपक्रमाचे महोत्सवाचे उद्घाटन करताना भावे बोलत होते. प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ, डॉ. राजश्री गोखले, डॉ. अनघा काळे, वृषाली महाजन, प्रसाद बर्वे आदी उपस्थित होते.

हारतो तेव्हाच खूप काही शिकतो
भावे म्हणाले, स्पर्धेचे विनाकारण दडपण घेतले जाते. जिंकतो पण त्यातून शिकत नाही, यापेक्षा जो हारतो पण खूप काही शिकतो, तो खर्‍या अर्थाने जिंकतो. अपयशी होण्यात काही दुःख नाही. एखाद्या गोष्टीला सामोरे जाणे म्हणजे स्पर्धा असते. ती आपली आपल्याशीच असते, दुसर्‍यांशी तुलना करणे योग्य नाही. माझ्या कालपेक्षा आजचा मी व उद्याचा मी महत्त्वाचा असतो.

सांस्कृतिक ठेवा जतन करणे
डॉ. रावळ म्हणाले, आपल्या देशाचा सांस्कृतिक ठेवा जतन, विकसित आणि वृद्धिंगत करणे हा अस्तित्व या उपक्रमाचा उद्देश आहे. यावर्षी पंधराशेहून अधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. प्रश्‍नमंजूषा, नृत्य, गायन, चित्रकला, छायाचित्रण, रेखाटन, कोलार्ज, डूडल मेकिंग, मेहंदी, निबंध आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.