निगडी : वापराविना पडून असल्याने निगडीतील अस्तित्व मॉलची दुरवस्था होत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने उभारलेल्या या मॉलचा विधायक वापर होणे गरजेचे आहे. त्यामुळे शहरातील ज्येष्ठ नागरिक, कलाकार आणि चित्रकारांसाठी हा मॉल नाममात्र दरात उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी भाजपचे सरचिटणीस अमोल थोरात यांनी केली आहे. याबाबत त्यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदनदेखील दिले आहे.
मॉलच्या जागेचा गैरवापर
पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे निगडी येथे अस्तित्व मॉल उभारण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अस्तित्व मॉलचा वापर बंद करण्यात आल्याने मॉलची दुरवस्था होत आहे. काही जणांकडून जेवण करण्यासाठी येथील मोकळ्या जागेचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे या मॉलची कचराकुंडी होत आहे. शहरातील चित्रकार, कलाकार, ज्येष्ठ नागरिक आदींसाठी अस्तित्व मॉल नाममात्र दरात उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यामुळे शहरातील कलाकार आणि चित्रकारांना त्यांच्या चित्र, पेंटींगचे प्रदर्शन आयोजित करणे सोयीचे होईल. तसेच ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या सभा, मेळावे आदी कार्यक्रम आयोजित करणे सहज शक्य होणार आहे, असे थोरात यांनी निवेदनात म्हटले आहे.