अस्थिरतेच्या उंबरठ्यावर झिम्बाब्वे!

0

झिम्बाब्वे या देशात 1980 साली मी मोटारसायकलवरून प्रवेश केला तेव्हा तो देश नुकताच स्वतंत्र झालेला होता आणि रॉबर्ट मुगाबे हे त्या देशाचे पहिले पंतप्रधान झाले होते. तेव्हा ते जनतेच्या गळ्यातले ताईत होते, हेही मला पदोपदी जाणवले होते. खरे तर त्यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध झुंज दिल्यानेच पूर्वीचा र्‍होडेशिया हा देश ब्रिटिशांपासून मुक्त झाला आणि झिम्बाब्वे हे नवे नाव घेऊन जगाच्या नकाशावर आला. ब्रिटिश सत्ताधार्‍यांविरुद्ध लढा देत असताना मुगाबे यांना दहा वर्षे कारावास भोगावा लागला होता, तरीही स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाची सूत्रे कृष्णवर्णीयांच्या हाती निर्विवादपणे एकवटली असतानाही पंतप्रधान रॉबर्ट मुगाबे यांनी सूडाचे राजकारण न करता, एक-दोन गौरवर्णीयांना आपल्या कॅबिनेटमध्ये घेतलेले होते. हिंदुस्थान स्वतंत्र झाला तेव्हा सगळे इंग्रज देशाबाहेर निघून गेले होते. मात्र, झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिकेत तसे झाले नव्हते. त्यामुळे मी झिम्बाब्वेत गेलो तेव्हाही तिथे हजारो गोरे लोक होते! आफ्रिकेतल्या राजकारणातले मला तेव्हा फारसे कळत नव्हते, आजही कळते असे बिलकूल नाही. परंतु घानाचे नक्रूमा, केनियाचे ज्योमो केन्याटा, टांझानियाचे ज्युलियस नेरेरे, झाम्बियाचे केनेथ कौन्डा, दक्षिण आफ्रिकेचे नेल्सन मंडेला आणि झिम्बाब्वेचे रॉबर्ट मुगाबे यांच्याबद्दल मी अगदीच अनभिज्ञ नव्हतो. मुगाबे हे उच्च शिक्षणासाठी घानाची राजधानी अक्रा येथे असताना त्यांचा तिथल्या एका मुलीशी प्रेमविवाह झाला होता. त्यांना एक मुलगाही झाला होता. परंतु, तो तीन वर्षांचा असतानाच मरण पावला होता.

तेव्हा मुगाबे ब्रिटिशांच्या कैदेत होते. त्यांना आपल्या मुलाला बघायलाही मिळाले नव्हते. झिम्बाब्वेमध्ये पुढे अध्यक्षीय लोकशाही अस्तित्वात आली आणि मुगाबे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले ते आजतागायत त्याच स्थानावर आहेत. माझे पती मरण पावले तरी त्यांच्या प्रेताला जनता निवडून देईल, इतके ते लोकप्रिय आहेत, अशी त्यांची द्वितीय पत्नी, ग्रेस मुगाबे कंठवानीने आजही सांगत आहे. ते तहहयात राष्ट्राध्यक्ष असावेत, असे तिला वाटते. लग्नापूर्वी ती रॉबर्ट मुगाबे यांच्या कार्यालयात टायपिस्ट होती. त्या दोघांचे सूत जमले असतानाच मुगाबे यांच्या प्रथम पत्नीचे आजारी पडून देहावसान झाले. त्यानंतर चार वर्षांनी मुगाबे यांनी पुनर्विवाह केला. ग्रेस आज 52 वर्षांची आहे, तर मुगाबे 94 वर्षे पूर्ण करण्याच्या मार्गावर आहेत! ग्रेस हीच आपली उत्तराधिकारी असावी असे मुगाबे यांना कितीही वाटत असले, तरी झिम्बाब्वेच्या बहुसंख्य जनतेला ते मान्य होण्यासारखे नाही. रॉबर्ट मुगाबे हे स्वयंप्रकाशी तारा आहेत हे मान्य करायलाच हवे. परंतु, ग्रेसबाबत तसे मुळीच म्हणता येत नाही. आपल्या पतीच्या गच्छंतीनंतर राष्ट्राध्यक्ष होण्याची स्वप्ने बघणार्‍या व्यक्तीचा काटा काढण्यात ती वस्ताद आहे असे दिसते.

रॉबर्ट मुगाबे यांच्या खांद्याला खांदा लावून एकेकाळी ब्रिटिशांविरुद्ध लढलेल्या झिम्बाब्वेच्या महिला उपराष्ट्रपती जॉईस मुजुरू यांना तिने मुगाबेंचे कान फुंकून पायउतार व्हायला भाग पाडले होते आणि एमर्सन नानंग्वा हे मुगाबे यांच्याशी एकनिष्ठ आहेत म्हणून त्यांची त्या जागी वर्णी लावण्याचे काम ग्रेसबाई यांनीच मुगाबे यांच्याकडून करवून घेतले होते. परंतु, कालांतराने नाकापेक्षा मोती जड होतोय आणि आपल्याच राजकीय भवितव्यावर गंडांतर येऊ पाहतेय, असे जाणवताच ग्रेसने नानग्वा यांचाही पदभार काढून घ्यायला मुगाबे यांना प्रवृत्त केले. तशात 94 वर्षांचे वयोवृद्ध मुगाबे हे सत्तासूत्रे सोडायचे नाव घेत नाहीत. त्यामुळे सध्या झिम्बाब्वेमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. नानंग्वा यांनीच आता देशाची सूत्रे हाती घ्यावीत, असे लष्करातले काही उच्च अधिकारी उघडपणे बोलू लागले आहेत. नानंग्वा यांना मुगाबे यांनी भले पक्षातून बडतर्फ केले असले, तरी मुगाबेंची स्वतःचीच पक्षावरची पकड सैल होत चालली आहे ही वस्तुस्थिती आहे. तत्कालिक लोकप्रियतेच्या लाटेवर आरूढ होऊन सत्तेवर आलेल्या राज्यकर्त्यांनी नंतरच्या काळात जनतेचा नाराजीचा सूर लक्षात न घेता, जनतेला वेठीस धरून बेमुर्वतपणे राज्यशकट रेटत नेण्याचा अट्टाहास केला, तर स्वाभाविकपणे जे होते तेच झिम्बाब्वेमध्ये होऊ घातले आहे, असे खेदाने म्हणावेसे वाटते!

– प्रवीण कारखानीस
9860649127